नवी दिल्लीMaratha Reservation :मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत राज्य सरकारसह इतरांनी दाखल केलेली क्युरेटिव्ह याचिका सर्वोच्च न्यायालयानं स्वीकारली आहे. त्यामुळं मराठा समाजाला मोठा दिलासा मिळला आहे. याबाबत माहिती देताना मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील म्हणाले, "सर्वोच्च न्यायालयानं आज क्युरेटिव्ह याचिकेवर भाष्य केलं आहे. सुप्रीम कोर्टानं पुन्हा एकदा क्युरेटिव्ह याचिकेवर 24 जानेवारी 2024 रोजी सुनावणी ठेवली आहे. त्यामुळं त्यावर लवकरात लवकर सुनावणी होऊन मराठा समाजाला हक्काचं आरक्षण मिळेल, असा विश्वास विनोद पाटील यांनी व्यक्त केला.
क्युरेटिव्ह पिटिशन न्यायालयानं स्वीकारली : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्य सरकारनं दाखल केलेल्या क्युरेटिव्ह याचिकेवर सुप्रीम कोर्टात काही दिवसांपूर्वी सुनावणी झाली होती. मुख्य न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडली होती. या वेळी राज्य सरकारनं सुनावणीवेळी आपली भूमिका मांडली. त्यामुळं सर्वोच्च न्यायालय लवकरच या प्रकरणावर निकाल देईल, अशी अपेक्षा होती. ज्यामध्ये क्युरेटिव्ह पिटिशन स्वीकारली जाणार की नाही, याकडं सर्वांचं लक्ष लागलं होतं. मात्र, अखेर आज न्यायालयानं क्युरेटिव्ह पिटिशन स्वीकारल्याचं विनोद पाटील यांनी सांगितलं आहे. त्यामुळं मराठा समाजासाठी हा मोठा दिलासा असल्याचं बोललं जात आहे.