नवी दिल्ली : 200 कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणातील आरोपी सुकेश चंद्रशेखर याने मोठा दावा केला आहे. शुक्रवारी पटियाला हाऊस कोर्टात सुकेशच्या प्रकरणात सुनावणी झाली. या सुनावणीनंतर बाहेर येत सुकेशने पत्रकारांना खुलासा करताना सांगितले की, सिसोदिया यांच्यानंतर आता पुढचा क्रमांक केजरीवालांचा आहे. या घोटाळ्यात आणखी अनेक मोठी नावे अडकणार असल्याचे सुकेशने यावेळी सांगितले. भविष्यात आणखी अनेक नावे उघड करून आम आदमी पक्षाच्या नेत्यांचा पर्दाफाश करणार असल्याचे तो म्हणाला.
अनेक मोठी नावे येणार समोर:सुकेश आज सुनावणीसाठी पटियाला हाऊस कोर्टात पोहोचला होता. सुनावणीनंतर न्यायालयातून बाहेर पडताना प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सुकेश म्हणाला की, अबकारी धोरणाच्या प्रकरणात आता पुढचा क्रमांक दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा येणार आहे. तपास यंत्रणा लवकरच अरविंद केजरीवाल यांनाही अटक करणार आहेत. या प्रकरणात संपूर्ण आम आदमी पक्ष सहभागी असल्याचे सुकेशने म्हटले आहे. आम आदमीचे सर्व लोक या प्रकरणात कसे गुंतले आहेत ते मी तुम्हाला सांगेन, असे सुकेश याने सांगितले. आणखी काही मोठी नावे तपास यंत्रणांसमोर येतील, असे सुकेश याने यावेळी बोलताना सांगितले.