कोलकाता -पश्चिम बंगालमधील नंदीग्राममध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीची हॉट सीट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नंदीग्राममध्ये भाजपाचे उमेदवार सुवेंदू अधिकारी यांच्या ताफ्यावर हल्ला झाला. नंदीग्राम विधानसभा मतदारसंघात सुरू असलेल्या मतदानादरम्यान ते एका मतदान केंद्रावर गेले होते. तेथून परतत असताना त्यांच्या काफिल्यावर दगडफेक झाली. शुभेंदू अधिकारी हे थोडक्यात बचावले. पण त्यांच्यासोबत असणाऱ्या प्रसारमाध्यमांच्या गाड्याचे नुकसान झाले आहे.
देशातील कोणत्याही राज्यात हिंसाचार होत नाही. बंगालला बांगलादेश बनवण्याचा कट रचला जात आहे. टीएमसी एका विशिष्ट समुदायाची प्रगती करून राजकीय हिंसाचार करीत आहे, असे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष म्हणाले.
पश्चिम बंगालमध्ये जंगलराज चालू आहे. जय बांगला अशी घोषणाबाजी करत हल्ला केला जात आहे. ही घोषणा बंगालची नसून बांगलादेशची आहे. पश्चिम बंगालला बांगलादेश बनवण्याची तयारी सुरू आहे, असे सुवेंदू अधिकारी म्हणाले.