पणजी (गोवा) - मूठभर बेशिस्त पर्यटकांमुळे गोव्याच्या संस्कृतीला ठेच पोहोचत आहे. बेशिस्त, गुन्हेगारी, ड्रग्जमाफियांमुळे गोव्याचे नाव राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर बदनाम होत आहे, म्हणून गोव्याला शिस्तबद्ध व संस्कृती जपणाऱ्या पर्यटकांची गरज असल्याचे राज्याचे पर्यटनमंत्री बाबू आजगावकर यांनी सांगितले. ते मंगळवारी अधिवेशनानंतर पत्रकारांशी बोलत होते.
हेही वाचा -लखनौवरून आग्राला जाणाऱ्या प्रियंका गांधींना पोलिसांनी महामार्गावरच रोखले!
राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर पर्यटनासाठी गोव्याची वेगळी ओळख आहे. अनेक पर्यटक जिवाचा गोवा करण्यासाठी येथे येत असतात. मात्र, यातील मूठभर पर्यटकांमुळे येथील पर्यटनाला, संस्कृतीला, पर्यावरणाला गालबोट लागत आहे. यावर पर्यटनमंत्री बाबू आजगावकर यांनी नाराजी व्यक्त केली.
आदरातिथ्य आमचे कर्तव्य, स्वच्छता, संस्कृती तुमची जबाबदारी, राज्यात येणाऱ्या पर्यटकांना उत्तम सुविधा उपलब्ध करून देणे, राज्यात कायदा, सुव्यवस्था राखणे हे सरकारचे कर्तव्य असून सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता राखणे, येथील संस्कृतीचे जतन करणे ही पर्यटकांची जबाबदारी असून आम्हाला गोव्याचे गोयंकारपण जपणारे पर्यटक महत्वाचे असल्याचे आजगावकर यांनी सांगितले. बेशिस्त व बसमध्ये स्वयंपाक करणाऱ्या पर्यटकांची राज्याला गरज नसल्याचेही आजगावकर यांनी सांगितले.
हेही वाचा -फेसबुकचे नाव बदलणार? लवकरच नव्या ब्रँडची होणार घोषणा