नवी दिल्ली/ग्रेटर नोएडा : ग्रेटर नोएडा येथे बुधवारी बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्र शास्त्री यांनी कथेचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात चेंगराचेंगरीची घटना घडली आहे. या घटनेत 10 जण जखमी झाल्याची माहिती असून अनेकजण बेशुद्ध झाले आहेत. या सर्वांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अनेक महिला बेशुद्ध पडल्या : पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी नोयडा येथे दिव्य दरबाराचे आयोजन केले होते. लोकांनी सांगितले की, व्हीआयपी पासच्या मागे असलेल्या छोट्या गेटमधून प्रवेश दिला जात होता. तेथे विजेच्या तारा लागून एका महिलेला शॉक बसला. तर अतिउष्णतेमुळे मंडपातील अनेक महिला बेशुद्ध झाल्या. यामुळे तेथे चेंगराचेंगरी झाली. मात्र, पोलिसांनी घटनास्थळी तडक अॅक्शन घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.
कार्यक्रमस्थळी अपेक्षेपेक्षा जास्त भाविक पोहोचले : धीरेंद्र शास्त्रींच्या या दिव्य दरबारात अपेक्षेपेक्षा खूप मोठ्या संख्येने भाविक पोहचले होते. हे सर्व धीरेंद्र शास्त्रींची एक झलक पाहण्यासाठी उतावळे दिसत होते. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून पोलिसांनी भाविकांना दिव्य दरबार संपल्याचे सांगितले आणि लोकांना घरी परतण्याची विनंती केली. लोकांना धीरेंद्र शास्त्रींचे प्रवचन घरूनच ऐकण्यास सांगण्यात आले. त्यांचा हा कार्यक्रम टीव्हीवर प्रसारित केला जात होता.