नवी दिल्ली Sports Ministry Suspends WFI :केंद्रीय क्रीडा मंत्रालयानं भारतीय कुस्ती महासंघाची (WFI) मान्यता रद्द केलीय. राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा आयोजित करण्याच्या घाईमुळं कुस्ती महासंघावर ही कारवाई करण्यात आलीय. मंत्रालयानं WFI चे नवनियुक्त अध्यक्ष संजय सिंह यांनाही निलंबित केलंय. संजय सिंह हे भाजप खासदार आणि WFI चे माजी अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्या जवळचे असल्याचं सांगितलं जातं.
- संजय सिंह यांनी भारतीय कुस्ती महासंघाची निवडणूक जिंकली आणि ते अध्यक्ष होणार हे निश्चित झाल्यापासूनच कुस्तीप्रेमींनी यावर आक्षेप घेतला होता. कुस्तीपटूंनी सांगितलं की, संजय सिंह हे भाजपा खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या जवळचे आहेत आणि अशा परिस्थितीत WFI मध्ये कोणत्याही प्रकारची सुधारणा होण्याची आशा नाही.
कारवाईची कारणं काय : क्रीडा मंत्रालयानं आज कुस्ती महासंघ आणि त्याचे नवनियुक्त अध्यक्ष संजय सिंह यांनाही निलंबित केलंय. मंत्रालयानं याबाबत सांगितलंय की, WFI नं विद्यमान नियमांकडं दुर्लक्ष केलंय. क्रीडा मंत्रालयानं अधिकृत प्रसिद्धीपत्रकात म्हटलंय की, राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा आयोजित करण्याची घोषणा घाईघाईनं करण्यात आली आणि नियमांचं पालन केलं गेलं नाही. उत्तर प्रदेशातील गोंडा इथं ही स्पर्धा आयोजित केली जाणार होती, जे ब्रिजभूषण सिंह यांचं क्षेत्र आहे.
नियमाविरुद्ध निर्णय घेतल्यानं कारवाई : मंत्रालयानं सांगितलं की, नवनिर्वाचित अध्यक्ष संजय कुमार सिंह यांनी 21 डिसेंबर रोजी कनिष्ठ राष्ट्रीय स्पर्धा या वर्षाच्या अखेरीस सुरु होतील हे जाहीर केलं. पण हे नियमाविरुद्ध आहे, कारण स्पर्धा सुरु करण्यासाठी किमान 15 दिवसांची नोटीस द्यावी लागेल, जेणेकरुन कुस्तीपटू तयारी करू शकतील. मंत्रालयानं आरोप केलाय की, नवीन संस्था पूर्णपणे जुन्या अधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली असल्याचं दिसते, ज्यांच्यावर आधीच लैंगिक छळाचे आरोप आहेत. प्रसिद्धीपत्रकात पुढं म्हटलंय की, नवनिर्वाचित मंडळ क्रीडा संहितेकडं पूर्ण दुर्लक्ष करुन माजी पदाधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली असल्याचं दिसून येतंय. जुन्या अधिकाऱ्यांच्या आवारातून कुस्ती महासंघाचं कामकाज चालवलं जातंय. यामध्ये महिला कुस्तीपटूंविरुद्ध लैंगिक छळाची तक्रार नोंदवण्यात आलेल्या परिसराचाही समावेश आहे. सध्या या प्रकरणाची न्यायालयातही सुनावणी सुरु आहे.
साक्षी मलिकनं कुस्ती स्पर्धेवर उपस्थित केले होते प्रश्न : ब्रिजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप करणारी ऑलिम्पिक पदक विजेती आणि महिला कुस्तीपटू साक्षी मलिकनं राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेवर प्रश्न उपस्थित केले होते. तिनं शनिवारी ट्विट करुन सांगितलं होतं की, मी कुस्ती सोडली असली तरी काल रात्रीपासून मी खूप अस्वस्थ आहे. ज्युनियर महिला कुस्तीपटू मला सांगत आहेत की दीदी 28 रोजी ज्युनियर नॅशनल स्पर्धा होणार आहे आणि नवीन कुस्ती महासंघानं नंदनी नगर गोंडा इथं या स्पर्धा आयोजित करण्याचं ठरवलंय.
हेही वाचा :
- कुस्तीपटू बजरंग पुनियानं परत केला 'पद्मश्री', मोदींना लिहिलं खरमरीत पत्र, PM आवासबाहेरील फूटपाथवर ठेवला पुरस्कार
- संजय सिंहांची WFI अध्यक्षपदी निवड होताच कुस्तीपटू साक्षी मलिकची निवृत्तीची घोषणा; पत्रकार परिषदेत बोलताना अश्रू अनावर