नवी दिल्ली - कोरोनाचा देशात वेगाने प्रसार होत असून रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. देशावर कोरोनाचे संकट असतानाचा आता म्यूकरमायकोसिस (ब्लॅक फंगस) नावाच्या रोगाचा प्रसार होत आहे. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी देशात म्यूकरमायकोसिसचे (ब्लॅक फंगस) वाढते रुग्ण आणि आवश्यक औषधांच्या कमतरतेच्या घटनांबाबत चिंता व्यक्त केली आहे. यासंदर्भात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहले आहे. पत्राद्वारे त्यांनी मोदींना ब्लॅक फंगसची लागण झालेल्या रुग्णांना दिलासा देण्यासाठी त्वरित पावले उचलण्याची विनंती केली
ब्लॅक फंगसला साथीचा रोग जाहीर करण्याच्या सूचना केंद्राने राज्यांना दिल्या आहेत. 'साथीचा रोग जाहीर करणे म्हणजेच त्यांच्या उपचारासाठी आवश्यक असणाऱ्या औषधांचे पुरेसे उत्पादन व पुरवठा सुनिश्चित करणे आवश्यक आहे. रूग्णांना नि: शुल्क सेवा देणे आवश्यक आहे', असे सोनिया गांधी यांनी पत्रात म्हटलं.
'अॅम्फोटेरिसिन-बी' हे या आजाराच्या उपचारांसाठी आवश्यक औषध आहे. तथापि, बाजारात या औषधाची तीव्र कमतरता असल्याचे वृत्त आहे. तसेच, हा आजार आयुष्मान भारत आणि इतर अनेक विमा अंतर्गत येत नाही. त्यामुळे सरकारने 'म्यूकरमायकोसिस'रूग्णांना दिलासा देण्यासाठी तातडीने पावले उचलली पाहिजेत', अशी विनंती त्यांनी पंतप्रधानांना केली.