बंगळुरू : गेल्या अनेक दिवसापासून कर्नाटक मुख्यमंत्री पदावरुन पेच निर्माण झाला आहे. मात्र आता हा पेच काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी मोठ्या शिताफीने सोडवला आहे. काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनी सिद्धरामय्या यांच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ टाकली आहे. त्यामुळे कर्नाटकच्या राजकारणात उठलेले वादळ आता शांत होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सिद्धरामय्या हे कर्नाटक काँग्रेसमधील स्वच्छ प्रतिमेचे नेते म्हणून गणले जातात. त्यामुळे कर्नाटकच्या मुख्यमंत्री पदावर त्यांचा दावा करण्यात येत होता.
स्वच्छ प्रतिमेचे काँग्रेस नेते :सिद्धरामय्या हे कर्नाटकातील स्वच्छ प्रतिमेचे काँग्रेसचे दिग्गज नेते म्हणून देशभर ओळखले जातात. त्यांच्यावर आतापर्यंत कोणतेही आरोप करण्यात आलेले नाही. त्यामुळे कर्नाटकच्या जनतेत त्यांच्याविषयी आदर आहे. नागरिकांच्या मनावर सिद्धरामय्या यांची पकड असल्याने जनतेनेही त्यांना मुख्यमंत्री पदाचा प्रमुख दावेदार म्हणून स्वीकारले आहे. त्यामुळे कर्नाटकात काँग्रेसला स्पष्ट बहुमत प्राप्त झाल्यानंतर सिद्धरामय्या यांनाच मुख्यमंत्री पदावर आरुढ करण्यात येणार असल्याची चर्चा सुरू होती.
ही सिद्धरामय्या यांची शेवटची निवडणूक :कर्नाटक काँग्रेसमध्ये सिद्धरामय्या यांचा चांगलाच दबदबा आहे. त्यांची जनमाणसात चांगलीच पकड आहे. कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी भाजपला हरवण्यात मोलाची भूमिका पार पाडली आहे. त्यांनी विधानसभा निवडणुकीत मुद्देसूद प्रचार करत भाजप नेत्यांवर 40 टक्के हप्तेखोरीचा आरोप केला. त्याचे परिणाम भाजप भोगत आहे. कर्नाटकच्या राजकारणात चांगली पकड असतानाही सिद्धरामय्या यांनी ही त्यांची शेवटची निवडणूक असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे त्यांच्या राजकारणातून निवृत्त होण्याच्या वक्तव्याने चांगलाच गोंधळ निर्माण झाला होता.
गरीब शेतकरी कुटूंबात जन्म : सिद्धरामय्या यांचा जन्म 12 ऑगस्ट 1948 रोजी म्हैसूर जिल्ह्यातील वरुणा होबळी येथील सिद्धरामन हुंडी या दुर्गम गावात झाला. सिद्धरामय्या गरीब शेतकरी कुटूंबातून आले आहेत. ग्रामीण कुटुंबातून आलेले सिद्धरामय्या हे त्यांच्या कुटुंबातील पहिले व्यक्ती होते, ज्यांनी म्हैसूर विद्यापीठातून बीएस्सीची पदवी घेतली. नंतर त्यांनी म्हैसूर विद्यापीठातून कायद्याची पदवी घेऊन काही काळ वकिली व्यवसाय केला. सिद्धरामय्या त्यांच्या विद्यार्थीदशेत वक्तृत्व कौशल्यासाठी ओळखले जात होते. डॉ राम मनोहर लोहिया यांनी मांडलेल्या समाजवादाचा त्यांच्यावर प्रभाव होता. दलित आणि समाजातील दुर्बल घटकांना सामाजिक न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी राजकीय क्षेत्रात प्रवेश केला.
1983 मध्ये झाले आमदार : सिद्धरामय्या यांनी भारतीय लोक दल पक्षाकडून 1983 निवडणूक लढवून आमदार झाले. म्हैसूर जिल्ह्यातील चामुंडेश्वरी विधानसभा मतदार संघातून त्यांनी 7 व्या कर्नाटक विधानसभेत प्रवेश केला. नंतर त्यांनी सत्ताधारी जनता पक्षात प्रवेश केला. ते कन्नड प्रहारी समितीचे (कन्नड कवलू समिती) पहिले अध्यक्ष आहेत. त्याची स्थापना कन्नडला अधिकृत भाषा म्हणून करण्याच्या अंमलबजावणीवर देखरेख करण्यासाठी करण्यात आली होती. राज्याच्या कन्नड भाषा आणि संस्कृतीच्या संवर्धनासाठी त्यांनी प्रयत्न केले.