१८६९ साली महात्मा फुले यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची रायगड येथील समाधी शोधून काढली व त्यांच्या जीवनावर सर्व प्रथम प्रदीर्घ पोवाडा लिहिला. रायगडावरील शिवाजी महाराजांच्या समाधीची व्यवस्था सरकारने स्वतःकडे घ्यावी असा अर्ज ज्योतिबांनी केला होता. १८७० साली महात्मा फुले यांनी पुणे येथे पहिली 'शिवजयंती' साजरी केली. त्यानंतर १८९५ मधे लोकमान्य टिळकांनी शिवजयंती उत्सव सुरू केला. जनतेने एकत्र येऊन अशा उत्सवांच्या निमित्ताने राष्ट्रप्रेम जागवावं आणि त्याचा वापर ब्रिटिशांविरुद्ध लढा देण्यासाठी करावा असा हेतू यामागे होता. सुरुवातीच्या काळात शिवजयंती फक्त महाराष्ट्रात साजरी होत होती. परंतु २० व्या शतकाच्या पहिल्या दशकात शिवजयंतीचा उस्तव बंगालमधे जाऊन पोहोचला.
शिवजयंती तारखांमध्ये मतभेद : पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरानजीक वसलेल्या शिवनेरी या डोंगरी किल्ल्यावर १९ फेब्रुवारी इ.स. १६३० मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. इतिहासाच्या अभ्यासकांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची नेमकी जन्मतारीख हा मतभेदांचा मुद्दा आहे. महाराष्ट्र राज्य शासनाने फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१ (शुक्रवार, १९ फेब्रुवारी १६३०) ही शिवरायांची जन्मतारीख २००१ साली स्वीकारली. तर इतर संभाव्य तारखांमध्ये ६ एप्रिल १६२७ (वैशाख शुद्ध तृतीया) ही एक जन्मतारीख मानली जात होती. महाराष्ट्र शासनाने शिवाजी महाराजांच्या जन्माच्या ( शिवाजी जयंती ) स्मरणार्थ १९ फेब्रुवारी हा दिवस सुट्टी म्हणून सूचीबद्ध केला आहे.
शिवबाच्या जन्माची माहिती : पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरानजीक वसलेल्या शिवनेरी या डोंगरी किल्ल्यावर १९ फेब्रुवारी इ.स. १६३० मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. शिवाजी महाराजांचे नाव शिवाई या देवतेवरून ठेवण्यात आले. एका आख्यायिकेनुसार शिवनेरी गडावरील शिवाई देवीला जिजाबाईंनी आपल्याला बलवान पुत्र व्हावा अशी प्रार्थना केली होती, म्हणून या मुलाचे नाव 'शिवाजी' ठेवले गेले. शिवरायांचे वडील शहाजीराजे भोंसले हे मराठा सेनापती होते, ज्यांनी दख्खनच्या सल्तनतची सेवा केली होती. त्यांच्या आई जिजाबाई होत्या, ज्या सिंदखेडच्या लखुजी जाधवरावांच्या कन्या होत्या. शिवाजी महाराज हे मराठा कुटुंबातील आणि भोसले कुळातील होते.