नवी दिल्ली : राष्ट्रीय राजधानी दिल्लीतून एक खळबळजनक घटना समोर आली आहे, जिथे सैनिक फार्म भागातील, फ्रीडम फायटर कॉलनीत एका 75 वर्षीय अभियंत्याची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दरोडेखोरांनी अभियंत्याच्या घरी लूटमार केली. यादरम्यान त्याने स्वत:चा बचाव करण्याचा प्रयत्न केला असता, सराईत गुन्हेगारांनी त्याची हत्या केली. दिल्ली पोलिसांना याची माहिती मिळताच अधिकाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली. वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले. सध्या या प्रकरणी फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी पोहोचली असून; या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
शेजाऱ्यांनी पोलिसांना दिली माहिती :दक्षिण जिल्हा पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी 9:30 वाजता माहिती मिळाली की, फ्रीडम फायटर कॉलनीच्या A1 ब्लॉकमध्ये राहणारे 75 वर्षीय सतीश भारद्वाज यांच्या घरात सामान विखुरलेले आहे आणि घरातील सामानात ते मृतावस्थेत पडले आहेत. भारद्वाज यांच्या शेजारी राहणाऱ्या एका व्यक्तीने याबाबत पोलिसांना माहिती दिली असता, मृत भारद्वाज यांच्या घरातील सामान विखुरल्याचेही त्यांनी सांगितले होते. त्याचवेळी, प्राथमिक तपासात दरोड्याच्या उद्देशाने वृद्धाची हत्या करण्यात आल्याचे पोलिसांना वाटत आहे. सध्या पोलीस पथक आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजही तपासत आहे, जेणेकरून मारेकऱ्याचा काही सुगावा लागू शकेल.