हरिद्वार (उत्तराखंड) : बहादराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी रात्री उशिरा मिरवणुकीत गोंधळ उडाला. भरधाव वेगात येणाऱ्या स्कॉर्पिओ गाडीने गाण्यांच्या तालावर नाचणाऱ्या वरातींना धडक दिली. या अपघातात एका बँड सदस्याचा जागीच मृत्यू झाला, तर 31 जण जखमी झाले आहेत. या अपघातानंतर वरातींनी कार चालकाला पकडून बेदम मारहाण केली. कार चालक हा भारतीय किसान युनियनचा नेता असल्याचे सांगण्यात येत आहे. सर्व जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
भरधाव कारची धडक : रस्त्याने मिरवणूक काढण्याची वेळ रात्री साडेदहा वाजेपर्यंत आहे. मात्र शुक्रवारी रात्री बारा वाजता बेलना गावातून निघालेली लग्नाची मिरवणूक बहादराबाद धानोरी रोडवरील सरदार फार्म हाऊसवर पोहोचली, त्यावेळी हा अपघात झाला. मिरवणुकीत गाण्यांच्या तालावर लोक नशेत नाचत होते. दरम्यान, बहादराबादहून धानोरीकडे भरधाव वेगाने येणाऱ्या स्कॉर्पिओ कारने रस्त्याच्या कडेला नाचणाऱ्या वरातींना धडक दिली.
एक ठार, 31 जखमी : गाडी एवढ्या वेगात होती की, ती एक-दोन जणांना धडकल्यानंतरही थांबली नाही. या अपघातात एका बँड सदस्याचा जागीच मृत्यू झाला. तर मिरवणुकीतील 31 जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यानंतर काही अंतरावर थांबलेल्या स्कॉर्पिओ कारला लोकांनी घेराव घातला व कारचालक आणि त्यातील लोकांना बेदम मारहाण केली. स्कॉर्पिओ चालक सहारनपूर जिल्ह्यातील भारतीय किसान युनियनचा सचिव असल्याचे सांगण्यात येत आहे.