पणजी : शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) च्या दोन दिवसीय शिखर परिषदेला गोव्यात सुरुवात झाली आहे. या परिषदेत परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी दहशतवादाचा मुद्दा उपस्थित केला. दहशतवादाचा अद्यापही बिमोड झाला नसल्याचे डॉ एस जयशंकर यावेळी म्हणाले. दहशतवाद्यांचा निधी रोखण्याची गरज असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी गोव्यात परराष्ट्र मंत्री परिषदेच्या बैठकीसाठी पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो झरदारी, चीनचे परराष्ट्र मंत्री किन गँग आणि रशियन सर्गेई लावरोव्ह यांचे स्वागत केले.
दहशतवादाचे समर्थन होऊ शकत नाही :गोव्यातील एससीओ SCO शिखर परिषदेत परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर यांनी दहशतवादावर चांगलाच प्रहार केला. दहशतवाद थांबण्याचे नाव घेत नाही. मात्र दहशतवादाचे कोणतेही समर्थन होऊ शकत नाही, यावर आमचा ठाम विश्वास आहे. सीमापार दहशतवाद थांबवला पाहिजे. दहशतवादाचा मुकाबला करणे हे SCO च्या बैठकीतील मुख्य उद्धीष्ट असल्याचेही एस जयशंकर यांनी यावेळी सांगितले.
टेरर फंडिंगला आळा घालण्याची गरज :परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी गोव्यात होणाऱ्या SCO परराष्ट्र मंत्र्यांच्या परिषदेसाठी किर्गिस्तान, कझाकस्तान, उझबेकिस्तान आणि ताजिकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांचेही स्वागत केले. जयशंकर यांनी SCO शिखर परिषदेत दहशतवादाचा मुद्दा उपस्थित केला. टेरर फंडिंगला आळा घालण्याची गरज आहे. आम्ही SCO निरीक्षक आणि सदस्य देशांना सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी आमंत्रित करुन अभूतपूर्व सहभागाची सुरुवात केल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
रशियन परराष्ट्र मंत्र्यांसोबत द्विपक्षिय बैठक :सध्या रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे. त्यामुळे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी रशियन परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव यांच्यासोबत दोन्ही देशांमधील धोरणात्मक भागीदारीचा आढावा घेतला. युक्रेन संकटावरून रशिया आणि पाश्चिमात्य देशांमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही नेत्यांची बैठक झाली. शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) च्या परिषदेत सहभागी होण्यासाठी पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो झरदारी गुरुवारी गोव्यात दाखल झाले आहेत. मात्र अद्याप एस जयशंकर आणि बिलावल भुट्टो यांच्यात बैठक होणार की नाही, या बाबत कोणतीही माहिती माध्यमांना देण्यात आली नाही.
हेही - Elephant Killed People : वीटभट्टीवर हत्तींचा राडा; उधळलेल्या हत्तीने एकाच कुटूंबातील तिघांना पायदळी चिरडले