करुर (तामिळनाडू) Satellite to Monitor Air Pollution : सध्या दिल्लीसह मुंबईत वायू प्रदूषण चर्चेचा विषय बनलाय. यातच एका चहा विक्रेत्याच्या मुलानं वायू प्रदूषणाच्या पातळीचं निरीक्षण करण्यासाठी एक अनोखा उपग्रह तयार केलाय. तामिळनाडूमधल्या करुर येथील 16 वर्षीय जयप्रकाश यानं हे उपग्रह तयार केलंय. यासाठी त्यानं विज्ञान शिक्षक रामचंद्रन आणि भरणी स्कूल ग्रुपचे प्राचार्य डॉ. रामसुब्रमण्यम यांचं मार्गदर्शन घेतलंय.
- उपग्रहाची किंमत अत्यंत कमी : जयप्रकाशन पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 10 ते 20 किलोमीटर अंतरावरील ट्रॉपोस्फियरमधील वायू प्रदूषणाची पातळी शोधण्यासाठी तयार केलेल्या छोट्या उपग्रहाची किंमतही खूप कमी आहे. कोट्यवधी खर्च करून तयार केलेल्या उपग्रहांप्रमाणे जयप्रकाश यान केवळ 30 हजार रुपयांच्या बजेटमध्ये या उपग्रहाचं काम पूर्ण केलंय.
काय म्हणाला जयप्रकाश : ईटीव्ही भारतला दिलेल्या एका विशेष मुलाखतीत, जयप्रकाश यानं स्पष्ट केलं की, त्याचा उपग्रह हा मुळात हेलियम बलून आहे. जो पारंपारिक अवकाश आधारित उपग्रहांना किफायतशीर पर्याय प्रदान करतो. या संपूर्ण प्रकल्पाची किंमत केवळ तीस हजार रुपये आहे. ज्यामुळं औद्योगिक प्रदूषण पातळीचं सतत निरीक्षण करणे किफायतशीर दरानं शक्य होईल. या उपग्रहाची रचना कारखान्यांमधून उत्सर्जित होणारे वायू शोधून काढण्यासाठी करण्यात आलीय. हा उपग्रह प्रदूषणाचे वाढणारे प्रमाण शोधून काढण्यासाठी मदत करणार आहे. जयप्रकाश याचा शोध प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना वायू प्रदूषकांवर प्रभावीपणे देखरेख ठेवण्यासाठी आणि त्यांचं व्यवस्थापन करण्यासाठी व्यावहारिक आणि किफायतशीर उपाय देऊ शकतो.