देहरादून Sam Bahadur : देशाचे पहिले फिल्ड मार्शल सॅम मानकशॉ यांच्या जीवनावर आधारित असलेलाल 'सॅम बहादुर' या चित्रपटाला आता प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळत आहे. तरुणांना त्यांच्यावर आधारित असलेल्या चित्रपटातून पहिले फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्याविषयी बरीच माहिती मिळत आहे. दिग्दर्शक मेघना गुलजार यांनी हा चित्रपट दिग्दर्शीत केला आहे. मात्र देशभरात चित्रपटाला यश मिळत असताना देहरादूनमध्ये असलेल्या फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्या आठवणी पुसण्याचं काम करण्यात येत आहे. देहरादूनमध्ये त्यांच्या नावानं असलेलं 58 जीटीसी म्हणजेच देहरादून गोरखा ट्रेनिंग सेंटर कनिष्ठ महाविद्यालय ही शाळा बंद करण्याची आता फक्त औपचारिकता बाकी राहिली आहे. या शाळेची स्थापना 11 ऑक्टोबर 1966 ला झाली होती.
फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांनी रचला होता पाया :या शाळेचा पाया पहिले फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांनी रचला होता. भारतीय सैन्य दलातील सैनिकांच्या मुलांना या शाळेत शिक्षण दिलं जात होतं. याशिवाय त्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांनीही आपल्या मुलांना या शाळेत दाखल केलं होतं. मात्र या शाळेत एकेकाळी एक हजारापेक्षा जास्त मुलं शिक्षण घेत होती. आता केवळ 50 मुलं या शाळेत शिकत असल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे ही शाळा बंद करण्यासाठी प्रशासनाकडून हालचाली सुरू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
फिल्ड मार्शल माणेकशॉ यांच्या आठवणी पुसण्याचा प्रयत्न :फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांनी पााया रचलेल्या या शाळेला बंद करण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत असल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे. शाळेच्या इमारतीच्या दुरावस्थेबाबत कँट बोर्डाकडून प्रशासनाला पत्रं लिहिली जात आहेत. मात्र त्याला प्रशासनाकडून कोणताही प्रतिसाद मिळत नाही. इमारत जीर्ण झाल्यानं या शाळेत विद्यार्थी संख्याही वाढवता येत नाही. त्यामुळे शाळा बंद करण्यासाठी वारंवार पत्रं लिहिली जात आहेत.