नवी दिल्ली : रशियाचे लुना २५ हे अंतराळयान चंद्रावर कोसळले आहे. रशियाची अंतराळ संस्था रोस्कोसमॉसने एका निवेदनाद्वारे ही माहिती दिली. (LUNA 25 Crashed).
रशियाचे स्वप्न भंगले : रशियाचे हे यान सोमवारी (21 ऑगस्ट) ला चंद्रावर सॉफ्ट लॅंडिगचा प्रयत्न करणार होतं. मात्र तत्पूर्वी तांत्रिक बिघाडामुळे ते कोसळले. यासह रशियाचे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणार पहिला देश बनण्याचे स्वप्न भंगले. आता सर्वांच्या नजरा भारताच्या चांद्रयानाकडे लागल्या आहेत. चांद्रयान 3, 23 ऑगस्टला चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लॅंडिंगचा प्रयत्न करेल.
चंद्राच्या पृष्ठभागाशी टक्कर झाली : रशियाचे लुना २५ हे अंतराळ यान अनियंत्रित कक्षेत फिरल्यानंतर चंद्रावर कोसळले, अशी माहिती रशियाची अंतराळ संस्था रोस्कोसमॉसने रविवारी दिली. लुना 25 ही रशियाची ४७ वर्षांतील पहिली चंद्र मोहीम होती. हे अंतराळयान एका अनियंत्रित कक्षेत गेले आणि चंद्राच्या पृष्ठभागाशी टक्कर झाल्यामुळे त्याचे अस्तित्व संपुष्टात आले, असे रोस्कोसमॉस एका निवेदनात म्हटलंय.
भारताच्या चांद्रयानापेक्षा शक्तिशाली होते : रशियाचे लूना 25 हे अतराळयान चंद्रावर 21 ऑगस्टला उतरणे अपेक्षित होते. तर भारताचे चांद्रयान 3, 23 ऑगस्टला चंद्रावर उतरणार आहे. लूना 25 चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणार होते, जिथे आजपर्यंत कोणतेच यान उतरू शकलेले नाही. विशेष म्हणजे, हे यान भारताच्या चांद्रयानापेक्षा जास्त शक्तिशाली होते. ते प्रक्षेपणानंतर अवघ्या 6 दिवसांत चंद्राच्या कक्षेत पोहोचले होते. मात्र भारताच्या चांद्रयानाला चंद्राच्या कक्षेत पोहोचायला 23 दिवस लागले.
रशियाने 47 वर्षानंतर केला होता प्रयत्न : पूर्वीच्या सोव्हियत युनियनच्या लुना 24 या अंतराळयानाने 1976 मध्ये चंद्रावर लँडिंग केली होती. त्यानंतर तब्बल 47 वर्षानंतर लुना 25 ही मोहिम हाती घेण्यात आली. सोव्हियत युनियन नंतर केवळ चीन 2013 मध्ये आणि 2018 मध्ये चंद्रावर यान उतरवण्यात यशस्वी झालाय. चीनने दोन्ही वेळा चंद्राच्या उत्तर ध्रुवावर यान उतरवले होते. मात्र अजून कोणताही देश चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर अंतराळयान उतरवू शकलेला नाही. चांद्रयान 3 मोहिम यशस्वी झाल्यास भारत असे करणारा जगातील पहिला देश बनेल
हे ही वाचा :
- Chandrayaan 3 : चंद्रावर कोणत्याही परिस्थितीत 23 ऑगस्टलाच करावे लागेल सॉफ्ट लँडिंग, अन्यथा...
- Chandrayaan 3 : चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणे एवढे अवघड का? जाणून घ्या