नवी दिल्ली - भारतीय चलनी नोटांवर महात्मा गांधींसोबतच रवींद्रनाथ टागोर आणि 11वे राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचा फोटोही दिसू शकतो. आतापर्यंत भारतीय नोटांवर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचेच छायाचित्र छापले जात होते. द न्यू इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, लवकरच काही नोटांवर रवींद्रनाथ टागोर आणि अब्दुल कलाम यांची छायाचित्रे दिसू शकतात.
अहवालानुसार, अर्थ मंत्रालय आणि आरबीआय काही नोटांवर रवींद्रनाथ टागोर आणि अब्दुल कलाम यांची छायाचित्रे छापण्याचा विचार करत आहेत ( RBI considers using images a Tagore and kalam on banknotes ). यासाठी, अर्थ मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या RBI आणि सिक्युरिटी प्रिंटिंग अँड मिंटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ( SPMCIL ) यांनी गांधी, टागोर आणि कलाम वॉटरमार्कचे दोन वेगवेगळे नमुने IIT-दिल्लीचे एमेरिटस प्रोफेसर दिलीप टी शाहनी यांना पाठवले आहेत. त्यांना दोन नमुन्यांमधून एक निवडण्यास सांगितले आहे आणि ते सरकारच्या अंतिम विचारासाठी ठेवण्यास सांगितले आहे, असे अहवालात म्हटले आहे.