लखनऊ UP ATS Detain Three Suspects : राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापुर्वी अयोध्येतून मोठी बातमी समोर आलीय. उत्तर प्रदेश एटीएसनं गोपनीय माहितीच्या आधारे तीन संशयित व्यक्तींना ताब्यात घेतलंय. अटक करण्यात आलेल्या संशयितांचं कॅनडात हत्या झालेल्या सुखा डंके आणि अर्श डाला यांच्या टोळीशी संबंध असल्याचं सांगण्यात येतंय.
संशयितांची तासभर चौकशी : कॅनडामध्ये मारले गेलेल्या सुखा डंके आणि अर्श डाला यांच्या टोळीशी संबंधित असलेल्या अयोध्येतील तिघांना यूपी एटीएसनं गुरुवारी ताब्यात घेतल्याचं समोर आल्यानं अयोध्या ते लखनौपर्यंत खळबळ उडाली होती. त्यानंतर सर्व सुरक्षा यंत्रणांनी अयोध्येत हाय अलर्ट जारी केलाय. यूपी एटीएस आणि आयबीनं तीन संशयितांची तासभर चौकशी केली. मात्र, चौकशीदरम्यान त्यांचा कोणत्याही दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याचं अद्याप समोर आलेलं नाही. धरमवीर असं ताब्यात घेतलेल्या तरुणाचं नाव असून तो राजस्थानमधील सीकर जिल्ह्यातील रहिवासी असल्याचं तपासात समोर आलंय.
अयोध्या जिल्ह्यातून तिन संशयित ताब्यात : राष्ट्रीय तपास संस्थेनं (NIA) अर्श डालाला वाँटेड घोषित केलंय. याशिवाय भारत सरकारनंही त्याला दहशतवादी घोषित केलंय. राज्याचे डीजी कायदा आणि सुव्यवस्था प्रशांत कुमार म्हणाले की, "राज्य सरकार आणि पोलिस मुख्यालयाच्या सूचनेनुसार चालविण्यात येत असलेल्या तपासणी मोहिमेदरम्यान, यूपी एटीएसनं अयोध्या जिल्ह्यातून तीन संशयित व्यक्तींना ताब्यात घेतलंय. या संशयितांची चौकशी सुरू आहे. आतापर्यंत त्यांचा कोणत्याही दहशतवादी संघटनेशी संबंध समोर आलेला नाही."
अयोध्येचं अभेद्य किल्ल्यात रुपांतर : राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापूर्वी अयोध्या शहराचं सुरक्षेच्या दृष्टीनं अभेद्य किल्ल्यात रुपांतर झालंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या सोहळ्यात सुमारे 8000 व्हीआयपी पाहुणे योणार आहेत. त्यामुळंच आकाशापासून जमिनीपर्यंत कडक निगराणी आणि सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आलीय. तसंच ड्रोनद्वारे सुरक्षेचं निरीक्षण केलं जाणार आहे. यासोबतच 10 हजारांहून अधिक सीसीटीव्ही कॅमेरेही बसवण्यात आले आहेत. हे सीसीटीव्ही प्रत्येक कानाकोपऱ्यावर नजर ठेवणार आहेत. ड्रोन आणि सीसीटीव्ही व्यतिरिक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या SPG (स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप) ते दहशतवादविरोधी पथक (ATS) पर्यंतचे विशेष कमांडो तैनात केले जाणार आहेत.
हेही वाचा :
- बॉम्बच्या धमकीनंतर अभेद्य सुरक्षा व्यवस्था; अयोध्येचं अभेद्य 'किल्ल्यात' रुपांतर!
- मोठी बातमी! पंतप्रधान मोदींच्या अयोध्या दौऱ्यात होऊ शकतो बदल, आता 'या' दिवशी जाणार अयोध्येला