मुंबई नावात काय आहे? असा शेक्सपिअरने प्रश्न केला होता. अनेकदा अनेकजण तो एकमेकांना विचारतही असतात. मात्र, काही नावं केवळ उच्चारली की त्या व्यक्ती त्या क्षेत्रात किती अत्युच्च स्थानावर पोहोचल्या होत्या हे लगेच लक्षात येतं. राकेश झुनझुनवाला हे त्यापैकीच एक नाव म्हणावं लागेल. राकेश झुनझुनवाला यांचं असं अकाली जाणं चुटपूट लावून गेलं आहे हजारो कोटींची मालमत्ता असलेला हा माणूस तसा मनाने मात्र अगदी साधा होता त्यांच्या पेहरावातही बऱ्याचदा दिसून येत असे त्यांच्या सुरकुतलेल्या शर्टचीही अशीच चर्चा Rakesh Jhunjhunwala Shirt अनेक दिवस होती.
चुरगळलेला शर्ट अन् राकेश झुनझुनवाला बिगबुल राकेश झुनझुनवाला यांनी अवघ्या पाच हजारांपासून गुंतवणूक क्षेत्रात आपली कारकीर्द सुरू केली होती आणि हजारो कोटींच्या मालमत्तेचे मालक बनले होते. एवढे ऐश्वर्य असले तरी श्रीमंतीची झिंग त्यांना कधीच चढली नाही. अनेकदा त्यांना अगदी साध्या पेहरावात पाहून त्यांच्या सभोवती असलेल्या लोकांच्या भुवया उंचावल्या जात असत. अशीच त्यांच्या चुरगळलेल्या शर्टची कहाणी आहे. एका कार्यक्रमात चक्क चुरगळलेला, इस्तरी नसलेला शर्ट घालून हा बिगबुल पोहोचला होता. ते पाहून इतरांना आश्चर्य वाटले नसते तरच नवल.
पंतप्रधानांच्या भेटीतही तसाच चुरगळलेला शर्ट काही महिन्यांपूर्वीच राकेश झुनझुनवाला यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सदिच्छा भेट घेतली होती. यावेळी त्यांच्या पत्नी रेखा यादेखील त्यांच्यासोबत होत्या. या भेटीदरम्यानही राकेश झुनझुनवाला यांनी चक्क आपले राहणीमान अत्यंत साधे ठेवले होते. विशेष म्हणजे यावेळी त्यांच्या अंगात तोच चुरगळलेला शर्ट घातलेला होता. पंतप्रधानांच्या सोबत झालेल्या भेटीचा फोटो प्रसिद्धी माध्यमांमध्ये झळकल्यानंतर तो चर्चेचा विषय झाला होता.