नवी दिल्ली - राज्यसभेचे ( Rajya Sabha ) कामकाज सुरू झाले तेव्हा नवनिर्वाचित सदस्य कपिल सिब्बल यांनी संसदेच्या वरच्या सभागृहाचे सदस्य म्हणून शपथ घेतली. त्यानंतर सभापती एम व्यंकय्या नायडू ( Venkaiah Naidu ) यांनी सांगितले की, त्यांना नियम 267 अंतर्गत विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे ( Congress ) ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह अनेक सदस्यांनी जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती वाढण्याच्या मुद्द्यावर चर्चा करण्याची मागणी केली आहे. मात्र, हे प्रकरण याआधीच सभागृहाने निकाली काढले आहे.
अग्निपथवरही चर्चेची मागणी - नायडू म्हणाले की, अनेक सदस्यांनी नियम 267 अंतर्गत अग्निपथ योजनेवरही चर्चा करण्याची मागणी केली आहे. तथापि, अन्य एखादेवेळी लेखी नोटीस देऊन या मुद्द्यांवर चर्चा केली जाऊ शकते. नियम 267 अन्वये नोटिसद्वारे चर्चेस सभापतींनी चर्चेची परवानगी नाकारल्यानंतर काँग्रेससह विरोधी पक्षांच्या अनेक सदस्यांनी निषेधाचे फलक दाखवित आक्रमक पावित्रा घेतला.
काँग्रेससह अन्य सदस्यांनी अत्यंत आक्रमक होत नायडूंसमोर निषेधाचे फलक झळकावले. त्यानंतर नायडू यांनी त्यांना ही कृती योग्य नसून त्यावर मी गांभीर्याने विचार करून निर्णय घेईन असे बजावले. सोमवारी पावसाळी अधिवेशन सुरू झाल्यापासून फारसे कामकाज झाले नसल्याने आठवडा वाया गेल्याची खंतही सभापतींनी व्यक्त केली.