जयपूर - राजकीय क्षेत्रातील मोठी बातमी आहे. राजकारणातील रणनीतीकार म्हणून ओळख असलेले प्रशांत किशोर (Prashant Kishor) हे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. त्यांनी नुकतेच राहुल गांधी व प्रियंका गांधी यांची भेट घेतली होती.
रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी दिल्लीमध्ये राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची भेट घेतलेल्या दिवशी राजस्थानचे महसूल मंत्री हरीश चौधरी (Harish Choudhary) दिल्लीमध्ये होते. त्यांनीही काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांची भेट घेतली होती. येत्या काळात प्रशांत किशोर महत्त्वाची जबाबदारी पार पडू शकतात, असे संकेत हरीश चौधरी यांनी दिले आहेत.
हेही वाचा-रोज कोण काय बोलतो, त्याला महत्त्व देण्याची गरज नाही - प्रफुल पटेल
हरीश चौधरी म्हणाले, की पश्चिम बंगालमधील निवडणुकीनंतर प्रशांत किशोर यांनी रणनीतीकार म्हणून काम करणार नसल्याची घोषणा केली होती. अशा परिस्थितीत राहुल गांधी यांची भेट घेण्याचा अर्थ प्रशांत किशोर हे महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. येत्या काळात प्रशांत किशोर हे काँग्रेसशी हातमिळवणी करू शकतात, असे संकेत आहेत.