गोवा -मंगळुरूहून मुंबईकडे जाणारी एक्सप्रेस दूधसागर धबधब्याजवळ रुळावरुन घसरली. सोनालीम आणि दूधसागर स्थानकांदरम्यान ही घटना घडली होती. रेल्वे रुळावर दरड कोसळल्यामुळे ही रेल्वे रुळावरुन खाली घसरल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली होती.
दरम्यान, या दुर्घटनेत जीवितहानी झाली नाही. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. मागील दोन दिवसांपासून मुंबई, कोकण किनारपट्टीसह गोव्यात मुसळधार पाऊस सुरू आहे.
दूधसागर धबधब्याजवळ एक्सप्रेस रुळावरून घसरली
महाराष्ट्रात पावसाचा हाहाकार -
महाड तळई गावात दरड कोसळली आहे. यात जवळपास ५० ते ६० नागरिक अडकले असल्याची प्राथमिक माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली होती. त्यातील ३६ जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौैधरी यांनी दिली आहे. तर, दुसरीकडे कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी, रायगडमध्ये देखील पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. या पावसाच्या हाहाकारामध्ये अनेकांचा मृत्यू झाला आहे.
दूधसागर धबधब्याजवळ एक्सप्रेस रुळावरून घसरली
दूधसागर धबधब्याबद्दल -
दूधसागर धबधबा भारतातील गोवा राज्यातील मांडोवी नदीवरील धबधबा आहे. हा धबधबा पणजीपासून ६० किमी अंतरावर आहे. हा धबधबा मडगाव-बेळगाव लोहमार्गावर असून मडगावच्या पूर्वेला ४६ किमी आणि बेळगावच्या दक्षिणेला ८० किमी अंतरावर आहे. दूधसागर धबधबा भारतातील सर्वात उंच धबधब्यांपैकी एक असून त्याची उंची ३१० मी (१०१७ फूट) आणि सरासरी रुंदी ३० मी आहे.
एक्सप्रेस रुळावरून खाली घसरली
हा धबधबा पश्चिम घाटातील भगवान महावीर अभयारण्य आणि मोल्लेम राष्ट्रीय उद्यानामध्ये आहे. हा भाग जैवविविधतेने संपन्न असलेल्या घनदाट जंगलांनी वेढलेला आहे. उन्हाळ्यामध्ये हा धबधबा अतिशय नेत्रदीपक नसला, तरी पावसाळ्यामध्ये विशेषतः ऑगस्टमध्ये याचे दृष्य विलोभनीय असते. दूधसागर धबधबा बराच प्रसिद्ध असल्याने येथे दरवर्षी ८ ते १० हजार स्थानिक तसेच विदेशी पर्यटक भेट देत असतात. हा धबधबा अभयारण्यात असल्याने तेथे जाण्यासाठी वन खात्याची परवानगी घ्यावी लागते.
एक्सप्रेस रुळावरून खाली घसरली