गुवाहाटी :काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी हिंसाचारग्रस्त मणिपूरला भेट दिली आहे. या भेटीवरुन मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमांनी राहुल गांधींना चांगलेच फटकारले आहे. हिंसाचाराच्या काळात राहुल गांधींचा मणिपूर दौरा म्हणजे माध्यमांमधील प्रचाराशिवाय दुसरे काही नाही. काँग्रेसचे वरिष्ठ नेते मणिपूरमधील दुःखद परिस्थितीतून राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप हिमंता बिस्वा सरमा यांनी केला. मणिपूरमधील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार प्रयत्नशील आहेत. त्यामुळे राहुल गांधींच्या एकदिवसीय दौऱ्याने या प्रदेशात काहीही बदल होणार नसल्याचेही हिमंता बिस्वा सरमा म्हणाले.
दुःखद परिस्थितीचा फायदा घेण्याचा प्रयत्न करू नये :कोणत्याही राज्यात अशी स्थिती निर्माण झाली तर, अशा दुःखद परिस्थितीचा फायदा घेण्याचा प्रयत्न करू नये, असेही हिमंता बिस्वा सरमा यांनी स्पष्ट केले. हिमंता बिस्वा सरमा यांनी मणिपूरमधील संघर्ष करणाऱ्या कुकी आणि मेईतेई समुदायांची दोन छायाचित्रे शेअर केली. त्यावर 'मणिपूरमधील परिस्थिती करुणेच्या माध्यमातून मतभेद दूर करण्याची मागणी करते. एखाद्या राजकीय नेत्याने आपल्या तथाकथित भेटीचा उपयोग वाद निर्माण करणे देशाच्या हिताचे नाही, असेही त्यांनी ट्विटमध्ये नमूद केले आहे.