श्रीनगर : काँग्रेस नेते राहुल गांधी हे लेह लडाखच्या दौऱ्यावर आहेत. राहुल गांधी यांनी त्यांचे वडील दिवंगत काँग्रेस नेते राजीव गांधी यांना त्यांच्या जयंतीदिनी लडाखमधील पँगॉग तलावाच्या काठी आज श्रद्धांजली अर्पण केली आहे. राहुल गांधी हे शनिवारी पँगॉग त्सोला बाईकवर गेले आहेत. आज त्यांच्या उपस्थितीत राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त पँगॉग तलावाच्या काठावर प्रार्थना सभा आयोजित करण्यात आली होती.
राजीव गांधींनी देशासाठी दिलं बलिदान :दिवंगत काँग्रेस नेते राजीव गांधी हे 1984 ते 1989 या काळात भारताचे पंतप्रधान होते. राजीव गांधी यांचा जन्म 20 ऑगस्ट 1944 ला झाला होता. त्यांनी अनेक क्षेत्रात भरीव योगदान दिलं होतं. त्यामुळे त्यांच्या कार्याचं स्मरण करण्यासाठी आम्ही इथं जमल्याची माहिती जम्मू काश्मीर प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विकार रसूल वाणी यांनी सांगितलं.
लेहमध्ये आल्यानंतर राहुल गांधींनी वाढवला दौरा :काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लेहमध्ये भेट देत तेथील जनतेसोबत संवाद साधला आहे. राहुल गांधी हे गुरुवारी दोन दिवसाच्या दौऱ्यावर लेहमध्ये गेले होते. त्यानंतर राहुल गांधी यांनी आपल्या दौऱ्याचा कालावधी वाढवल्याची माहिती काँग्रेसमधील सूत्रांनी दिली आहे. आता राहुल गांधी 25 ऑगस्टपर्यंत लेह आणि लडाखच्या दौऱ्यावर राहणार आहेत. जम्मू काश्मीर आणि लेहचं विभाजन झाल्यानंतर पहिल्यांदाच राहुल गांधी हे लेहच्या दौऱ्यावर आले आहेत. 5 ऑगस्ट 2019 ला कलम 370 आणि 35 (ए ) हटवण्यात आलं होतं. त्यानंतर आता राहुल गांधी लेह आणि लडाखच्या दौऱ्यावर आल्यानं त्यांच्या दौऱ्याला महत्व प्राप्त झालं आहे.
राहुल गांधी लेहमध्ये घेणार फुटबॉल सामन्यांचा आनंद :राहुल गांधी यांनी लेहमध्ये भेट दिल्यानंतर तेथील तरुणांसोबत शुक्रवारी संवाद साधल्याची माहिती काँग्रेसच्या वतीनं देण्यात आली आहे. राहुल गांधी लेहमध्ये फुटबॉल सामन्याचा आनंद घेणार आहेत. महाविद्यालयीन जीवनात राहुल गांधी हे चांगले फुटबॉलपटू होते, त्यामुळे लेहमध्ये गेल्यानंतर ते फुटबॉल सामना पाहुन खेळाडूंचं मनोबल वाढवणार आहेत. राहुल गांधी हे 25 ऑगस्टला कारगीलमध्ये होणाऱ्या लडाख ऑटोनॉमस हिल डेव्हलपमेंट कौन्सिल (LAHDC) निवडणुकीच्या बैठकीलाही हजेरी लावणार आहेत.
हेही वाचा -
- Rahul Gandhi : लडाखच्या रस्त्यावर बाईक चालवताना दिसले राहुल गांधी; लोक म्हणाले, 'धूम 4 चा हिरो मिळाला'
- Rahul Gandhi On Pandit Neharu : नेहरु मेमोरियल म्युझियमचे नाव बदलल्यानंतर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...