रायपूर ( छत्तीसगड ) :२४ फेब्रुवारीपासून सुरू असलेल्या काँग्रेसच्या अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. आज अधिवेशनात कृषी शेतकरी कल्याण, सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण, युवकांचे शिक्षण आणि रोजगार या तीन प्रस्तावांवर चर्चा होणार आहे. सामाजिक न्याय आणि सबलीकरण अंतर्गत, जाती-आधारित जनगणनेवर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. सकाळी 10 वाजता काँग्रेसच्या अधिवेशनाला सुरूवात होणार आहे. यानंतर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी सकाळी 10.30 वाजता अधिवेशनाला संबोधित करतील. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांचे दुपारी २ वाजता समारोपाचे भाषण होणार आहे. दुपारी 3 वाजता ढोरा येथे जाहीर सभा होणार आहे.
अनेक मोठे बदल :शनिवारी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेस पक्षात अनेक मोठे बदल करण्यात आले. काँग्रेस पक्षात नवीन युनिट्स निर्माण झाली आहेत. ज्या अंतर्गत आता बूथ कमिटी, पंचायत काँग्रेस कमिटी, शहरांमधील वॉर्ड काँग्रेस कमिटी, मध्यवर्ती काँग्रेस कमिटी किंवा मंडल कमिटी, ब्लॉक काँग्रेस कमिटी, जिल्हा काँग्रेस कमिटी आणि प्रदेश काँग्रेस कमिटी स्थापन करण्यात येणार आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाला नवे रूप येणार आहे. ब्लॉक, जिल्हा आणि राज्यस्तरीय कार्यकारिणीतील प्रत्येक स्तरावर काँग्रेसचे निवडून आलेले सदस्य, मग ते पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य किंवा इतर निवडून आलेले लोकप्रतिनिधी असोत, ते आपोआप ब्लॉक, जिल्हा काँग्रेसचे सदस्य होतील.