नवी दिल्ली: स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त देश यंदा स्वातंत्रयाचा अमृत महोत्सव साजरा करत आहे. या संदर्भात मोदी सरकारने ‘हर घर तिरंगा’ अभियान सुरू केले आहे. पीएम मोदींसह भाजपच्या अनेक नेत्यांनी सोशल मीडियावर त्यांचे प्रोफाइल फोटोही बदलले आहेत. दरम्यान, काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) आणि भारतीय जनता पक्षावर (BJP) निशाणा साधला आहे. घरोघरी तिरंगा मोहिमेबाबत त्यांनी दोघांवर हल्लाबोल केला आहे.
खादी ग्रामोद्योग कामगारांची भेट -राहुल गांधी यांनी कर्नाटकातील खादी ग्रामोद्योग कामगारांची भेट घेतली. यानंतर त्यांनी ट्विट केले आणि लिहिले की, कर्नाटक खादी ग्रामोद्योगच्या सर्व मित्रांना भेटून खूप आनंद झाला. आरएसएसवर निशाणा साधत त्यांनी लिहिले की, इतिहास साक्षी आहे की, प्रत्येक घराघरात तिरंगा मोहीम चालवणारे अशा संस्थेतून बाहेर पडले, ज्यांनी 52 वर्षे तिरंगा फडकवलाच नाही. ते म्हणाले, स्वातंत्र्य लढ्याच्या काळापासून ते काँग्रेस पक्षाला रोखू शकले नाहीत आणि आजही रोखू शकणार नाहीत.
भाजपनेही साधला काँग्रेसवर निशाणा - भाजपने देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचे फोटो सोशल मीडिया प्रोफाइलवर हातात तिरंग्यासह डीपी म्हणून टाकल्याबद्दल काँग्रेसवर टीका केली. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी कुटुंबाच्या बाहेर विचार करावा आणि आपल्या नेत्यांना तिरंग्यासोबत त्यांचे चित्र लावण्याची परवानगी द्यावी, असे भाजपने म्हटले आहे. भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा काँग्रेसवर निशाणा साधत म्हणाले, प्रत्येक मुद्द्यावर घराणेशाहीचे राजकारण होता कामा नये. देशाचे पहिले पंतप्रधान असलेल्या आपल्या नेत्याचा फोटो त्यांनी तिरंग्यासोबत लावला आहे. तिरंगा गरिबांचाही आहे आणि 135 कोटी भारतीयांचाही आहे.