नवी दिल्ली - देशात कोरोनाचा कहर असून आतापर्यंत देशात चार लाख जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशातील एकूणच विदारक परिस्थितीवरून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी गेल्या काही दिवसांपासून केंद्र सरकारवर टीका करत आहेत. आज त्यांनी पुन्हा लसीकरणावरून केंद्र सरकारला लक्ष केले. 'जुलै महिना आला, मात्र, लस नाही आली', असे त्यांनी टि्वट केले आहे. यासोबतच त्यांनी #WhereAreVaccines हा हॅशटॅगदेखील टि्वट केला.
राहुल गांधींनी गुरूवारी अनुदानित सिलिंडरच्या किंमतीत 25 रुपयांची वाढ झाल्यानंतर केंद्रावर टीका केली. राहुल गांधी यांनी ट्विटरवर #LPGPriceHike हा हॅशटॅग टि्वट केला. 2016 ते 2021 पर्यंत सिलिंडरच्या किमतींमध्ये कशी वाढ झाली, याचा आलेख त्यांनी टि्वट केला. तसेच मोदींचा असा प्रभाव पडला की, फक्त जुमल्यांचे भाव कोसळले, असे ते टि्वटमध्ये म्हणाले.
कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी लसीकरण हे सर्वात मोठं हत्यार आहे. मात्र गेल्या काही दिवसात लसींच्या तुटवड्यामुळे लसीकरणाचा वेग मंदावला आहे. देशात कोरोनावर नियत्रंण मिळवण्यासाठी लसीकरण मोहिम राबवण्यात येत आहे. सध्या देशात कोविशिल्ड , कोव्हॅक्सिन आणि स्पुटनिक व्ही लसीच्या माध्यमातून लसीकरण करण्यात येत आहे.