पाहा काय म्हणाले राहुल गांधी जालौर (राजस्थान) Rahul Gandhi Panauti : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मंगळवारी राजस्थानमध्ये जाहीर सभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्ला चढवला. राहुल गांधींनी १९ नोव्हेंबर रोजी क्रिकेट विश्वचषकाच्या फायनलमध्ये भारताच्या पराभवासाठी मोदींना जबाबदार धरलंय. स्टेडियममध्ये त्यांची उपस्थिती ही 'पनौती' होती, असं राहुल गांधी म्हणाले.
मोदींचं नाव न घेता टीका केली : राजस्थानच्या जालौर जिल्ह्यात एका निवडणूक रॅलीला संबोधित करताना राहुल गांधी म्हणाले की, मेन इन ब्लूनं सामना जिंकला असता. पंतप्रधान मोदींचं नाव न घेता राहुल गांधी म्हणाले की, 'पनौती'मुळे संघाचा पराभव झाला. "आमच्या खेळाडूंनी विश्वचषक जवळपास जिंकलाच होता, मात्र 'पनौती' मुळे त्यांना ट्रॉफी गमवावी लागली". राहुल गांधीं यांच्या या व्यक्तव्यानंतर उपस्थित लोकांमध्ये एकच हशा पिकला. विशेष म्हणजे, विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात टीम इंडियाच्या पराभवानंतर सोशल मीडियावर 'पनौती' हा शब्द ट्रेंडमध्ये होता.
मोदींनी भारतीय खेळाडूंचं सांत्वन केलं : पंतप्रधान कार्यालयानं मंगळवारी, अंतिम सामन्यातील पराभवानंतर मोदी टीम इंडियाच्या खेळाडूंचं सांत्वन करत असतानाचा व्हिडिओ जारी केला. यानंतर काही तासांनी राहुल गांधी यांची ही टिप्पणी आली आहे. पंतप्रधान मोदींनी मॅच संपल्यानंतर टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूमला भेट दिली आणि खेळाडूंशी संवाद साधला. व्हिडिओमध्ये मोदी विराट कोहली आणि रोहित शर्मा यांचं सांत्वन करताना दिसत आहेत. त्यांनी दोन खेळाडूंचे हात धरून त्यांचा उत्साह वाढवला. मोदींनी या स्पर्धेत सर्वाधिक विकेट घेणाऱ्या मोहम्मद शमीलाही मिठी मारून त्याचं सांत्वन केलं.
अंतिम सामन्यात दारूण पराभव : भारतानं या संपूर्ण विश्वचषकात दमदार कामगिरी केली. सलग १० सामने जिंकून अंतिम फेरीत धडक देणाऱ्या टीम इंडियाला फायनलमध्ये मात्र ऑस्ट्रेलियाकडून दारूण पराभवाला सामोरं जावं लागलं. पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील कांगारुंनी प्रथम भारताला २४० धावांत गुंडाळलं, आणि त्यानंतर २४१ धावांचं लक्ष्य ४३ षटकांत ४ गडी गमावून सहज गाठलं.
हेही वाचा :
- रडवेल्या भारतीय संघाला मोदींनी घेतलं कवेत; वर्ल्डकप पराभवानंतर ड्रेसिंगरुममध्ये पोहोचले मोदी, शमीची भावनिक पोस्ट