नवी दिल्ली-सर्वोच्च न्यायालयाने 'मोदी' आडनाव बदनामी घोटाळ्यातील प्रकरणात अंतरिम स्थगिती दिल्यानंतर लोकसभा सचिवालयाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. लोकसभा सचिवालयाने अधिसूचना काढत राहुल गांधींना खासदारकी पूर्ववत दिल्याचे म्हटले आहे. त्यामुळे राहुल गांधी यांना केरळमधील 'वायनाड' या मतदारसंघाचे खासदार म्हणून संसदेत परतण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना पुन्हा खासदारकी बहाल केल्यानंतर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मलिल्कार्जुन खरगे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले, की भाजपा आणि मोदी सरकारने विरोधी नेत्यांना टार्गेट करून लोकशाहीला बदनाम करण्यापेक्षा प्रत्यक्ष कामावर लक्ष केंद्रित करावे. खरगे यांनी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांना मिठाई भरवून आनंद व्यक्त केला आहे.
लोकसभा अध्यक्षांनी निर्णय घेतला असून आम्ही कायदेशीर प्रक्रियेचे पालन केले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची प्रत मिळताच पूर्ववत खासदारकी देण्यात आली आहे-संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी
काँग्रेसमध्ये जल्लोष-ज्या पद्धतीने खासदारकीसाठी लोकसभा सचिवालयाकडून वेगवान पद्धतीने कारवाई करण्यात आली, त्याच पद्धतीने खासदारकी पुन्हा बहाल करण्यात यावी, अशी काँग्रेसकडून मागणी करण्यात येत होती. अखेर, आज लोकसभा सचिवालयाने अधिसूचना काढून राहुल गांधींना संसदेत येण्याचा मार्ग मोकळा केला आहे. राहुल यांना पुन्हा खासदारकी बहाल झाल्याने काँग्रेसमध्ये आनंदाचे वातावरण आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन यांनी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना पेढा भरवून आनंद व्यक्त केला. काँग्रेस कार्यकर्त्यांनी ढोल वाजवत जनपथ येथे जल्लोष केला.
काय आहे नेमके प्रकरण-'मोदी' आडनाव बदनामी प्रकरणात सुरत न्यायालयाने राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा ठोठावली होती. त्यानंतर लोकसभा सचिवालयाने राहुल गांधींची खासदारकी रद्द करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानंतर काँग्रेसकडून भाजपावर जोरदार टीका झाली. राहुल यांनी सुरत उच्च न्यायालयाच्या शिक्षेविरोधात गुजरात उच्च न्यायालयात अपील केले. मोदी बदनामी प्रकरणात माफी मागणार नसल्याचा निर्धार राहुल गांधींनी व्यक्त केला होता. गुजरात उच्च न्यायालयाकडूनदेखील दिलासा मिळाला नसल्याने राहुल गांधींनी नुकतेच सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधी यांना दिलासा दिला. सर्वोच्च न्यायालयाने सुरत उच्च न्यायालयाच्या निकालाला अंतरिम स्थगिती दिली.
हेही वाचा-
- Rahul Gandhi : सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया; सांगितला पुढचा प्लॅन
- Rahul Gandhi : राहुल गांधींचा संसदेत 'कमबॅक', अविश्वास प्रस्तावावरील चर्चेतही होणार सहभागी