नवी दिल्ली -देशात माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी 1975 ते 1977 म्हणजेच 21 महिने आणीबाणी लागू केली होती. हा आणीबाणीचा निर्णय चुकीचा होता. आणि त्या काळात जे घडले. ते चुकीचेच होते, असे इंदिरा गांधी यांचे नातू आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. त्या काळात जे झालं आणि आज देशात जे होतंय, या दोन्हीत फरक असल्याची त्यांनी म्हटलं. कॉर्नेल विद्यापीठाच्या आयोजित कार्यक्रमात प्रख्यात अर्थशास्त्रज्ञ कौशिक बासु यांच्याशी बोलत होते.
आणीबाणी काळामध्ये घटनात्मक हक्क आणि नागरी स्वातंत्र्य निलंबित केले गेले होते. तसेच प्रसारमाध्यमांच्या अधिकारांवर गदा आणली होती आणि राजकीय विरोधकांना तुरूंगात टाकण्यात आले होते. मात्र, ती परिस्थिती सध्याच्या परिस्थितीपेक्षा भिन्न आहे, असेही राहुल गांधी म्हणाले.
मला वाटते की ती एक चूक होती आणि माझ्या आजीने (इंदिरा गांधी) हे मान्य केले होते. मात्र, काँग्रेसने कधीही भारताची घटनात्मक संरचना काबीज करण्याचा प्रयत्न केला नाही. अगदी स्पष्टपणे सांगायचे झाले, तर काँग्रेस पक्षाची रचना ते करण्याची परवानगी देत नाही, असं राहुल गांधी म्हणाले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देशातील संस्थामध्ये आपल्या लोकांची भरती करत आहे. भाजपाला निवडणुकीमध्ये पराभूत केले. तरी आपण त्या लोकांपासून मुक्त होऊ शकत नाही, असे राहुल गांधी म्हणाले. तसेच त्यांनी मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्यासोबतची एक आठवण सांगितली. मध्य प्रदेश सरकारचे वरिष्ठ अधिकारी त्यांचे म्हणणे ऐकत नव्हते. कारण, ते आरएसएसचे होते. त्यामुळे सध्या जे काही घडत आहे. ते पूर्ण वेगळे आहे, असे ते म्हणाले.