नवी दिल्ली :सर्वोच्च न्यायालयाने मोदी आडनाव प्रकरणी राहुल गांधींना मोठा दिलासा दिला. न्यायालयाने त्यांच्या शिक्षेला स्थिगिती दिली. यामुळे आता राहुल गांधींचा पुन्हा संसदेत येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ते आता विरोधी पक्षांच्या मोदी सरकारवरील अविश्वास प्रस्तावाच्या चर्चेतही सहभागी होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे.
राहुल गांधींचे ट्विट : न्यायालयाच्या या निकालानंतर राहुल गांधी यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली. 'समोर काहीही येऊ द्या, माझे कर्तव्य तेच राहणार आहे - भारतीयत्वाचे रक्षण करणे', असे राहुल गांधी म्हणाले. 'आज नाही तर उद्या, उद्या नाही तर परवा, सत्याचा विजय होतोच. माझा मार्ग मोकळा आहे. माझ्या मनात स्पष्टता आहे की मला काय करायचे आहे आणि माझे काम काय आहे. ज्या लोकांनी आम्हाला मदत केली त्यांचे मी आभार मानतो. लोकांच्या प्रेम आणि समर्थनासाठी मी त्यांचे आभार मानतो', असे राहुल गांधी म्हणाले.
प्रियंका गांधींचे ट्विट : या निकालानंतर राहुल गांधी यांची बहिण आणि कॉंग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी देखील ट्वीट केले. 'तीन गोष्टी जास्त काळ लपून राहू शकत नाहीत - सूर्य, चंद्र आणि सत्य', असे त्यांनी गौतम बुद्धांचा दाखला देऊन ट्विट केले. 'योग्य निर्णय दिल्याबद्दल माननीय सर्वोच्च न्यायालयाचे आभार - सत्यमेव जयते', असेही त्या ट्विटमध्ये म्हणाल्या.