नवी दिल्ली Bharat Nyay Yatra : भारत जोडो यात्रेच्या यशानंतर राहुल गांधी पुढील वर्षी १४ जानेवारी ते २० मार्च या कालावधीत पुन्हा एकदा देशव्यापी यात्रेला निघणार आहेत. हा भारत जोडो यात्रेचा दुसरा टप्पा असेल. भारत जोडो यात्रेनं दक्षिण-उत्तर असा प्रवास केला होता. ही यात्रा पूर्व-पश्चिम प्रवास करणार आहे. या यात्रेला 'भारत न्याय यात्रा' नाव देण्यात आलं असून, ती देशभरातील ९० लोकसभा मतदारसंघांतून जाईल. काँग्रेसच्या २०२४ लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या दृष्टीनं या यात्रेचं विशेष महत्व आहे.
या राज्यांतून जाणार यात्रा : 'भारत जोडो यात्रा' देशातील आर्थिक विषमता, राजकीय केंद्रीकरण आणि सामाजिक ध्रुवीकरणाच्या विरोधात होती. तर, 'भारत न्याय यात्रा' राजकीय, आर्थिक आणि सामाजिक न्याय मिळवून देण्यावर भर देईल. ही यात्रा मणिपूर, नागालँड, आसाम, मेघालय, पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड, ओरिसा, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात आणि महाराष्ट्र या १४ राज्यांमधून प्रवास करेल.
लोकसभा निवडणुका दृष्टीक्षेपात : याबाबत काँग्रेसचे आसाम आणि मध्य प्रदेशचे प्रभारी जितेंद्र सिंह यांनी अधिक माहिती दिली. "पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकांत राहुल गांधी काँग्रेसच्या प्रचाराचं नेतृत्व करणार आहेत. यात्रेच्या पहिल्या टप्प्यानं पक्षात नवचैतन्य आणलं होतं. आता दुसऱ्या टप्प्यातही तेच होईल अशी अपेक्षा आहे. हा एक व्यापक जनसंपर्क कार्यक्रम असेल", असं जितेंद्र सिंह यांनी सांगितलं.
विरोधी पक्षांना एकत्रित आणण्याचा उद्देश : पक्ष सूत्रांच्या मते, प्रारंभी, महात्मा गांधींचं जन्मस्थान असलेल्या गुजरातमधील पोरबंदर येथे ही यात्रा संपवण्याची योजना होती. परंतु नंतर ते ठिकाण मुंबईत हलवण्यात आलं. येथे २० मार्च रोजी विरोधी पक्षांच्या रॅलीचं आयोजन केलं जाऊ शकतं. भारत जोडो यात्रेनं समविचारी विरोधी पक्षांना एकत्रित आणण्यात महत्वाची भूमिका बजावली होती. आता हीच आघाडी I.N.D.I.A. म्हणून ओळखली जाते. माहितीनुसार, भारत न्याय यात्रेचा मार्ग सुमारे ६,२०० किमीचा असेल, जो भारत जोडो यात्रेच्या ४,००० किमी मार्गापेक्षा लक्षणीय वाढला आहे. मात्र यापैकी बहुतेक अंतर बसनं पूर्ण केलं जाईल.