चंदीगड/दिल्ली : आपचे खासदार राघव चढ्ढा यांना राज्यसभेतून निलंबित करण्यात आल्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राघव चढ्ढा पंजाबमधून राज्यसभेचे खासदार आहेत. त्यांच्याशी संबंधित हा काही पहिलाच वाद नाही. ते या आधीही अनेक वादात सापडले आहेत.
पंजाबमधून राज्यसभा सदस्य म्हणून निवडून येण्यास विरोध : पंजाबमध्ये आम आदमी पक्षाचे सरकार निवडून आल्यानंतर, पक्षाने राज्यातून राघव चढ्ढा यांना राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय घेतला. मात्र याला पंजाबच्या लोकांनी आणि राजकारण्यांनी मोठ्या प्रमाणात विरोध केला होता. राघव चढ्ढा पंजाबी नसल्याने त्यांना विरोध करण्यात आला होता. आम आदमी पक्षाला राज्यसभेवर पाठवण्यासाठी कोणी पंजाबी नेता सापडला नाही का, अशा प्रतिक्रिया त्यावेळी सोशल मीडियावर उमटल्या होत्या.
बंगल्याच्या वाटपावरून वादात : राघव चढ्ढा यापूर्वी बंगल्याच्या वाटपावरून वादात अडकले आहेत. खासदार राघव चढ्ढा यांना दिल्लीच्या लुटियन झोनमध्ये बंगला देण्यात आला होता. नियमांच्या पलीकडे जाऊन त्यांना हा व्हीआयपी बंगला दिला गेला होता. त्यावेळी बंगला वाटपाचा हा मुद्दा चांगलाच गाजला. या प्रकरणी वाद वाढल्यानंतर राज्यसभा सचिवालयाने त्यांना बंगला नाकारला. राज्यसभा सचिवालयाच्या या आदेशाविरोधात राघव चढ्ढा यांनी पटियाला हाऊस कोर्टात याचिका दाखल केली होती.