महाराष्ट्र

maharashtra

दख्खनेतील महाराष्ट्र..! आयपीएस अधिकारी महेश भागवत यांच्या कार्याची तेलंगाणामध्ये छाप

By

Published : May 1, 2021, 6:05 AM IST

Updated : May 1, 2021, 7:00 AM IST

आयपीएस अधिकारी महेश भागवत यांच्या कार्याची तेलंगाणामध्ये छाप पडली आहे. जाणून घेऊया त्यांच्या कार्याबद्दल.

ips mahesh bhagwat
आयपीएस अधिकारी महेश भागवत

हैदराबाद - प्रत्येक क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाने वेगळी ओळख निर्माण करण्याचा मराठी माणसांचा इतिहास आहे. त्यामुळेच आपले राज्य 'महा'राष्ट्र म्हणून ओळखले जाते. सध्याच्या कोरोना परिस्थितीमध्ये देखील दक्षिणेतील मराठमोळे अधिकारी आपल्या कार्याचा ठसा उमटवत आहेत. आजच्या महाराष्ट्र दिनानिमित्ताने जाणून घेऊया अशा एका मराठी अधिकाऱ्याबद्दल ज्याने तेलंगाणात अन्नदाता अशी ओळख निर्माण केली आहे.

आयपीएस अधिकारी महेश भागवत

खाकीतला माणूस जेव्हा सामान्य माणसाच्या भल्यासाठी अहोरात्र एक करतो तेव्हा व्यवस्थेवरचा, यंत्रणेवरचा विश्‍वास दृढ होतो. वर्दी अंगावर असतानाही एखादा माणूस सामान्य माणसात मिसळून काय करू शकतो हे पहायचे असेल तर रचाकोंडाचे पोलीस आयुक्त महेश भागवत यांच्याकडे पाहावे. हैदराबादच्या जवळच असलेल्या तीन पोलीस आयुक्तालयांमध्ये रचाकोंडाचा समावेश होतो.

महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील असलेले महेश भागवत यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाचा मोठा ठसा तेलंगाणा राज्यात उमटवला आहे. महेश भागवत हे तेलंगाणाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक व रचाकोंडा विभागाचे पोलीस आयुक्त म्हणूत काम पाहत आहेत. प्रत्येक मराठी माणसाला अभिमान वाटावा, असेच कार्य महेश भागवत यांचे आहे. 2020 वर्षीच्या लॉकडाऊन काळात महेश भागवत यांनी अनेक गरजूंना अन्न वाटप केले. तसेच कित्येक स्थलांतरित नागरिकांना मदत केली आहे.

खरा हीरो! तब्बल 40 हजार लोकांसाठी देवदूत -

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील वर्षी संपूर्ण देशात लॉकडाऊन होता. या काळात हातावर पोट असणाऱ्या मजुरांवर उपासमारीची वेळ आली होती. महेश भागवत हे अक्षरश: देवदूत बनून या लोकांच्या मदतीला आले. तेलंगाणातील 41 वृद्धाश्रम त्यांनी दत्तक घेतले होते. तेथील 1 हजार 600 वृद्धांच्या जेवणाची सोयही त्यांनी केली होती. तसेच निराधार 20 हजर आणि 40 हजार मजुरांच्या अन्नाची सोय त्यांनी केली. यासोबत या मजुरांना त्यांच्या मूळ गावी जाता यावे यासाठी पुढाकार घेऊन त्यांनी मदत केली.

आयपीएस अधिकारी महेश भागवत

मागील वर्षी तेलंगाणातील अनेक विलगीकरण कक्षाला महेश भागवत यांनी भेटी देत तेथील अडचणी सोडवण्याचे काम केले. तसेच या काळात कायदा मोडणाऱ्यांना वठणीवर आणण्याचे कामही त्यांनी केले. तसेच लॉकडाऊनच्या काळात तेलंगाणात अडकलेल्या 40 हजार परप्रांतीय कामगारांना जेवणापासून ते त्यांच्या गावी पाठवण्यापर्यंतची सर्व मदत महेश भागवत यांनी केली.

सर्वसामान्यांना मदतीचा हात -

हैदराबादला अनेक हॉस्पिटलमध्ये नांदेड, लातूर या सरहद्दीवरील जिल्ह्यातील कोरोना रुग्ण आहेत. यातील अनेक जण डिस्चार्ज होत आहेत. काही खूपच उशिरा आले, त्यांना मात्र वाचवण्यासाठी प्रयत्न कमी पडत आहेत. बेड उपलब्ध करून देणे, प्लाझ्मा डोनर शोधणे अशी मदत करत असल्याचे महेश भागवत यांनी 'ईटीव्ही भारत'सोबत बोलताना सांगितले. तसेच या कोरोना काळात ईटीव्हीमधील अनेक पत्रकारांना महेश भागवत यांनी मदत केली आहे.

आयपीएस अधिकारी महेश भागवत

पोलीस आयुक्तांची साथ...राचकोंडा पोलीस योद्ध्यांची कोरोनावर मात

कोरोना झालेल्या व्यक्तींना मानसिक आधाराची, पाठबळाची मोठी गरज असते. त्या व्यक्तींशी सकारात्मक बोलत रहायलाच हवे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत रचाकोंडा पोलीस कार्यक्षेत्रातील अनेक पोलिसांना कोरोनाची लागण झाली होती. कोरोना झालेल्या पोलिसांना आधार देण्यासाठी महेश भागवत यांचे मोठे योगदान आहे. जेवढी काळजी ते सर्वसामान्य नागरिकांची घेतात तेवढीच काळजी ते आपल्या पोलीस सहकाऱ्यांची घेतात.

आयपीएस अधिकारी महेश भागवत

महेश भागवत यांच्या कार्याची पाऊलवाट -

महेश भागवत १९९५ साली केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झाले आणि भारतीय पोलीस सेवेत सामील झाले. मुळ पाथर्डीचे असलेल्या भागवत यांचे आईवडील शिक्षक होते. पाथर्डीच्या विद्या मंदिरात शिक्षण घेतलेल्या भागवतांनी पुण्यातून सिव्हील इंजिनिअरींग केले. सध्या आंध्रप्रदेश आणि तेलंगाणातील अनेक अधिकार्‍यांचे ‘आयडॉल’ ठरलेले मराठमोळे भागवत त्यांच्या कर्तव्यकठोर भूमिकेमुळे जगभर दखलपात्र ठरले आहेत. मानवी तस्करी रोखण्यात अभिनव पद्धतीने प्रयत्न करणारे आयपीएस अधिकारी महेश भागवत यांना अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याने २०१७ चा टीआयपी रिपोर्ट हिरो पुरस्कार देऊन गौरवले आहे.

आयपीएस अधिकारी महेश भागवत

महेश भागवत यांनी विविध ठिकाणी बजावले कार्य -

मणिपूर-त्रिपुरा केडरमध्ये इंफाळला सहाय्यक पोलीस अधीक्षक म्हणून पहिली नेमणूक महेश भागवत यांची झाली होती. त्यानंतर आंध्रप्रदेश केडरमध्ये नियुक्ती करण्यात आली होती. नंतर आंध्रप्रदेशमधील आदिलाबाद येथे पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती झाली. नक्षलग्रस्त असणारा हा भाग, येथील चार वर्षांच्या काळात १४५ नक्षलवादी शरण आले तेही कोणताही बळाचा वापर न करता. सध्या ते तेलंगाणाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक, त्याचबरोबर रचाकोंडाचे पोलीस आयुक्त म्हणून काम पाहत आहेत.

आयपीएस अधिकारी महेश भागवत
Last Updated : May 1, 2021, 7:00 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details