नवी दिल्ली -पंजाबच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यापासून कॅप्टन अमरिंदर सिंग काँग्रेस पक्ष सोडणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर अमरिंदर सिंग यांनी बुधवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना भेटण्यासाठी त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी दाखल झाले आहेत. सांगितले जात आहे, की अमरिंदर सिंग भाजपमध्ये प्रवेश करू शकतात.
गेल्या काही दिवसांपासून पंजाबमध्ये राजकीय हालचाली वेगवान झाल्या आहेत. पंजाब काँग्रेसमध्ये अंतर्गत घमासान सुरू असताना माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते कॅप्टन अमरिंदर सिंग केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीला दाखल झाल्याने अनेक तर्क-वितर्क लढवले जात आहेत. अमरिंदर सिंग मंगळवारीच दिल्लीत दाखल झाले आहेत आणि ते कालच अमित शाह यांची भेट घेणार होते. मात्र नवज्योतसिंग सिद्धूंनी पंजाब काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर राजकीय खळबळ माजली. त्यानंतर काँग्रेस मंत्रिमंडळातील चार सदस्यांनी राजीनामा देत आपली नाराजी जाहीर केली. या सर्व घडामोडींमुळे शाह आणि सिंग यांची भेट पुढे ढकलण्यात आली. मात्र काल अमरिंदर सिंग यांनी आपण अमित शाह यांची भेट घेणार नसल्याचे स्पष्ट करून दिल्लीतील आपल्या निवासस्थानी आल्याचे सांगितले होते. मात्र आज कॅप्टन व शाह यांच्या भेटीने ते लवकरच भाजपवासी होतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.