नवी दिल्लीPune ISIS Module Case-राष्ट्रीय तपाससंस्थेनं (NIA) पुण्यातील इसिस मॉड्युल प्रकरणात आठव्या आरोपीला गुरुवारी अटक केली. दहशतवादी गटाकडून चालविण्यात येणाऱ्या कारवायांबाबत एनआयकडून तपास सुरू आहे. पुण्यातून आठव्या आरोपीला अटक झाल्यानं एनआयच्या तपासात महत्त्वाचा दुवा हाती लागण्याची शक्यता आहे. मोहम्मद शाहनवाझ आलम असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. हा दहशतवादी झारखंमधील हजारीबाग येथील रहिवाशी आहे.
दहशतवादाला प्रोत्साहन देण्यासाठी हा मोहम्मद शाहनवाझ आलम हा सक्रिय असल्याचा एनआयएला संशय आहे. एनआयच्या प्रवक्त्यानं म्हटलं की, पुण्यातील इसिस मॉड्युल प्रकरणात आलम हा थेट सहभागी होता. दहशतवाद्यांना लपण्याचं ठिकाण म्हणून वापरण्याच्या उद्देशानं हेरगिरी करण्यात आणि अद्ययावत स्फोटकसाठी साधने (आयईडी) तयार करण्यात दहशतवादी आलमनं सक्रिय भूमिका बजावली होती. तसंच गोळीबाराचे प्रशिक्षण देण्यासाठी त्यानं सक्रिय सहभाग नोंदविल्याची माहिती एनआयएच्या अधिकाऱ्यानं दिली. दहशतवाद्यांना पकडण्यासाठी पुणे पोलिसांकडून कारवाई सुरू होताच हा आरोपी १९ जुलैला पळून जाण्यात यशस्वी ठरला होता. त्याला पोलिसांनी दुचाकी चोरताना रंगेहाथ पकडले होते. त्याच्याबरोबर मोहम्मद इमरान आणि मोहम्मद युनुस साकीला पोलिसांनी अटक केली होती. एनआयनं आरोपीला अटक करण्याकरिता३ लाखांचे बक्षीस जाहीर केलं होतं.
एनआयएकडून सखोल तपास-आरोपींचा पुण्यातील इसिस मोड्युलमधून दहशतवादी कृत्य करण्याचा डाव होता, हे एनआयएला तपासात आढळून आले. दहशतवादी कृत्यातून सामाजिक शांतता आणि धार्मिक सलोखा बिघडविणं हे इसिसचे उद्दिष्ट आहे. इसिसकडून सातत्यानं भारतविरोधी मोहिम राबविली जाते. तसेच देशात हिंसाचार घडवून आणण्यासाठी विविध माध्यमांतून इसिसकडून आजवर प्रयत्न करण्यात आले आहेत. दहशतवाद्यांचे दहशत आणि हिंसाचार घडविण्याचा डाव उधळून लावण्यासाठी एनआयएकडून सखोल तपास करण्यात येत असल्याचं एनआयच्या अधिकाऱ्यानं सांगितले.