भोपाळ :मध्य प्रदेश भाजपाचे खासदार ज्योतिरादित्य सिंधिया उद्या ग्वाल्हेर दौऱ्यावर असणार आहेत. मात्र यापूर्वीच काँग्रेसने त्यांच्या दौऱ्याला विरोध केला आहे. काँग्रेस प्रवक्ते सिद्धार्थ राजावत यांनी आज सिंधिया यांच्या जय विलास पॅलेसवर पोस्टर लावले आहेत. या पोस्टरवर "मध्य प्रदेश में कोरोना भागा, जनसेवक रूपी कुंभकरण ज्योतिरादित्य सिंधिया जागा" असे लिहिले आहे.
सिंधिया तीन महिन्यांनंतर येणार ग्वाल्हेरला..
सध्या सिंधिया प्रदेशात आणि पक्षात दबदबा निर्माण करण्यासाठी राज्याचा दौरा करत आहेत. गुरुवारी ते ग्वाल्हेरमध्ये जाणार आहेत. मात्र त्यापूर्वीच काँग्रेसने त्यांच्याविरोधात घोषणाबाजी सुरू केली आहे. काँग्रेस प्रवक्ते राजावत यांनी आज सिंधियांना 'कुंभकर्ण' म्हणणारे पोस्टर लावले. तसेच, ठिकठिकाणी त्यांच्याविरोधात घोषणाबाजीही करण्यात आली. तीन महिन्यांपूर्वी जेव्हा शहरातील कोरोना परिस्थिती गंभीर होती, तेव्हा मात्र सिंधिया हजर नव्हते. मात्र आता कोरोनाचा प्रसार कमी झाल्यानंतर ते येत आहेत, त्यामुळे आम्ही त्यांचा विरोध करत असल्याचे काँग्रेसने स्पष्ट केले.