मुंबई : भारतीय क्रिकेटपटू पृथ्वी शॉसोबत सेल्फी घेण्यावरून गैरवर्तन केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेली सोशल मीडिया स्टार सपना गिल हिने शुक्रवारी न्यायालयात दावा केला की, तिच्यावर हल्ला करणारा शॉच होता. ती म्हणाली की, शॉने तिची माफी मागितली असून त्याने पोलिस तक्रार न करण्याची विनंती केली आहे. गुरुवारी अटक करण्यात आलेल्या गिलला शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने तिला 20 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
'शॉने माझी माफी मागितली' :बुधवारी मुंबईच्या सांताक्रूझ भागातील एका आलिशान हॉटेलबाहेर शॉने गिलसोबत सेल्फी घेण्यास नकार दिल्याने दोघांमध्ये हाणामारी झाली होती. सुनावणीदरम्यान, गिलने या घटनेबाबत आपली बाजू मांडण्याची परवानगी देण्याची विनंती केली, जी न्यायदंडाधिकाऱ्यांनी मान्य केली. आपल्यावर लावण्यात आलेले सर्व आरोप खोटे असल्याचे गिल म्हणाली. शॉने छातीवर आणि हातावर मारल्याचा आरोप तिने केला आहे. सपनाने सांगितले की, आम्ही फक्त पोलिसांची मदत घेण्यासाठी तिथे गेलो होतो. ते 8 ते 10 लोक होते आणि आम्ही फक्त दोन जण होतो. गिलने दावा केला की, शॉ आणि त्याच्या मित्रांनी तिला पोलिस तक्रार न करण्याची विनंती करत तिची माफी मागितली आहे.
'शॉ दारूच्या नशेत होता' :या घटनेनंतर गिल म्हणाली की, मी त्याला ओळखत नाही आणि मी त्याला कधी पाहिले नाही. मी त्याला कधीही सेल्फी काढण्यास सांगितले नाही. हे प्रकरण शांत करण्यासाठी तिने 50 हजार रुपये मागितल्याचा आरोपही सपनाने फेटाळून लावला आहे. पृथ्वी शॉ पूर्णपणे दारूच्या नशेत होता, असा दावा गिलने केला. तो पोलिस स्टेशनसमोर होता, तो तेव्हा एफआयआर दाखल करू शकला असता, पण तो दारूच्या नशेत होता म्हणून त्याने एफआयआर नंतर दाखल करण्याचा विचार केला. गिलच्या म्हणण्यानुसार, शॉ येण्यापूर्वी तो आणि त्याचे मित्र हॉटेलच्या व्हीआयपी लाउंजमध्ये पार्टी करत होते. शॉ एका व्यापारी मित्रासोबत हॉटेलमध्ये जेवायला गेला असताना ही घटना घडली.
सपना गिलला 20 तारखेपर्यंत पोलीस कोठडी : भोजपुरी चित्रपटांमध्ये काम केलेली सपना गिल क्रिकेटर पृथ्वी शॉ सोबत झालेल्या वादामुळे चर्चेत आली आहे. पृथ्वी शॉसोबत झालेल्या भांडणानंतर तिला पोलिसांनी अटक केली होती. तिने आणि तिच्या सहकारी मित्रांनी पृथ्वी शाॅ बरोबर सेल्फीवरून वाद घातला होता. या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने आरोपी सपना गिलला 20 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
हेही वाचा :Shiv Jayanti In JNU : जेएनयूत शिवजयंतीवरून राडा, महाराजांच्या प्रतिमेची तोडफोड केल्याचा अभाविपचा आरोप