रिवा : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रिवा येथे भेट देणार असून येथील एसएफ मैदानावर आयोजित पंचायत राज संमेलनाच्या मुख्य कार्यक्रमाला ते उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर पंतप्रधान मोदी यावेळी विविध विभागांच्या विकासकामांचे लोकार्पण करणार आहेत. या कार्यक्रमात पंतप्रधान विविध रेल्वे प्रकल्प राष्ट्राला समर्पित करणार असून रिवा ते नागपूर ट्रेनला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी जलजीवन मिशनच्या 7853 कोटी खर्चाच्या पाच मोठ्या नळ योजनांची पायाभरणी करणार आहेत.
नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार विविध कार्यक्रमाचे उद्घाटन :पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रिवा येथे खरीपासाठी तयार केलेल्या एकात्मिक ई ग्राम स्वराज आणि जीईएम पोर्टलचे उद्घाटन करणार आहेत. या कार्यक्रमात सर्वसमावेशक विकास या थीमवर अमृत महोत्सव मोहिमेअंतर्गत सर्वसमावेशक विकास वेबसाइट आणि मोबाइल अॅप लॉन्च करण्यात येईल. या कार्यक्रमाला आलेल्या लाखो नागरिकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित करणार आहेत. ग्रामीण विकास योजनांच्या यशावर प्रकाश टाकणारा धरती कहे पुकार के हा कार्यक्रम सादर केला जाणार आहे. याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते देशातील 1 कोटी 25 लाख लाभार्थ्यांना मालकी हक्काचे कार्ड दिले जाणार आहेत. तसेच मध्य प्रदेशातील 4 लाख लाभार्थ्यांना पंतप्रधान आवास योजनेतून बांधण्यात आलेल्या घरांमध्ये गृहप्रवेशाचा कार्यक्रमही यावेळी करण्यात येणार आहे.
आयुष्यमान भारत योजनेत महिलांना मिळणार विमा :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 9 योजनांचे एकत्रीकरण करुन 5.5 कोटी महिलांना विमा कवच देण्याचे निश्चित केले आहे. आयुष्मान भारत योजनेतून ब्रेस्ट आणि सर्व्हायकल कर्करोगावर उपचार करण्याची योजना आखण्यात आली आहे. आहे. त्यामुळे देशातील 500 जिल्ह्यातील तब्बल 5.5 कोटी महिलांना या योजनेचा फायदा होणार आहे.