शाहडोल : या दिवसात तुम्ही बाजारात गेलात तर तुम्हाला सफरचंद आणि इतर फळे सगळीकडे पाहायला मिळतील, पण टोमॅटो विकत घेण्यासाठी तुम्हाला संघर्ष करावा लागेल. कारण आजकाल बाजारात टोमॅटो दिसेनासे झाले आहेत. टोमॅटो फक्त काही निवडक दुकानांमध्येच विकले जात आहेत. टोमॅटोचे भाव इतके वाढले आहेत की, त्यामुळे आता भाजीपाला व्यापाऱ्यांचेही नुकसान होत आहे. एक किलो टोमॅटोमध्ये जर एक-दोन टोमॅटो जरी खराब झाले तर व्यापाऱ्यांचे नुकसान होते. त्यामुळे बहुतांश व्यापाऱ्यांनी दुकानात टोमॅटो ठेवणे बंद केले आहे. मुख्य म्हणजे, श्रीमंताचे फळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सफरचंदापेक्षाही टोमॅटोचे भाव आता जास्त झाले आहेत!
सफरचंदाची किंमत अचानक घसरली : दिनेश राजपाल हे फळविक्रेते आहेत. ते सांगतात की, गेल्या काही दिवसांपासून सफरचंदाच्या दरात मोठी घट झाली आहे. काही दिवसांपूर्वीच सफरचंद बाजारात २८० ते ३०० रुपये किलो दराने विकले जायचे. त्यानंतर सफरचंदाची किंमत अचानक घसरली. सफरचंद आता केवळ ६० रुपयांपासून ते १२० रुपयांपर्यंत मिळत आहे. म्हणजेच सफरचंदाची किंमत तब्बल १५० ते २०० रुपयांनी घसरली आहे. सध्या बाजारात डाळिंब ८० ते १२० रुपये दराने उपलब्ध आहे. केळीचा भाव ४० ते ६० रुपये प्रति डझन आहे. तर पेरू ७० ते ८० प्रति किलो दराने उपलब्ध आहे. एकंदरीतच फळांचा भाव टोमॅटोपेक्षाही स्वस्त झाला आहे.