पाटणा (बिहार) - भारताचे पुढील राष्ट्रपती कोण होणार? यासाठी 18 जुलै रोजी मतदान होणार आहे. जनतेने निवडून दिलेले लोकप्रतिनिधी या निवडणुकीत सहभागी होतात. अशा परिस्थितीत एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांनी बिहारला भेट दिली. पाटण्यात आमदार आणि खासदारांची भेट घेऊन राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत पाठिंबा मागितला. तसेच, बिहार आणि झारखंडशी आपले जुने नाते आहे असा खुलासाही त्यांनी यावेळी केला आहे. मुर्मू यांनी या दौऱ्यात बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचीही भेट घेतली. या भेटीनंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मुर्मू या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत प्रचंड मतांनी विजयी होतील असा विश्वास व्यक्त केला आहे.
राष्ट्रपतीपदाची निवडणूक मुर्मू मोठ्या मताधिक्याने जिंकतील - मुख्यमंत्री नितीश यांनी द्रौपदी मुर्मू यांच्याशी संवाद साधला. (Nitish Kumar on Draupadi Murmu) यादरम्यान, मुर्मू यांनी त्यांचा पाठिंबा मागितला. सीएम नितीश यांनी केवळ पाठिंबा जाहीर केला नाही तर प्रचंड मतांनी राष्ट्रपती होण्याचा विश्वासही व्यक्त केला. यावेळी जेडीयूचे राष्ट्रीय अध्यक्ष लालन सिंह उपस्थित होते. पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, बिहार आणि झारखंड या दोन्ही राज्यांसाठी ही आनंदाची बाब आहे. राष्ट्रपतीपदाची निवडणूक मुर्मू मोठ्या मताधिक्याने जिंकतील याची आम्हाला खात्री आहे.
भगवान बिरसा मुंडा यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण - याआधी एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू विशेष विमानाने पाटण्याला पोहोचल्या होत्या. जेथे एनडीएच्या नेत्यांनी त्यांचे भव्य स्वागत केले. पाटणा विमानतळावर त्यांचे स्वागत करण्यासाठी एनडीएतील अनेक नेते उपस्थित होते. जीतन राम मांझी, पशुपती कुमार पारस आणि जेडीयूचे प्रदेशाध्यक्ष उमेश कुशवाह हेही त्यांचे स्वागत करण्यासाठी पोहोचले. यानंतर त्या थेट हार्डिंग रोडवर गेल्या, जिथे त्यांनी भगवान बिरसा मुंडा यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला.