दरभंगा (बिहार) Pond Missing In Darbhanga : बिहारच्या दरभंगामध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. दरभंगा जिल्ह्यात चक्क तलावच चोरीला गेलाय. हे प्रकरण शहरातील विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रभाग क्रमांक चारमधील नीम पोखरचं आहे. भूमाफियांनी गुपचूप मातीचा भराव करुन या जमिनीवर ताबा घेण्याचा प्रयत्न केला. तिथं एक झोपडी आणि बांबूची भिंतही बांधलीय. प्रशासनाच्या संगनमतानं हा तलाव भरुन याठिकाणी घर बांधल्याचा नागरिकांचा आरोप आहे.
- लोक काय म्हणतात? : स्थानिक रहिवासी सत्तोकुमार साहनी यांनी सांगितलं की, 10-15 वर्षांपूर्वी मच्छीमार समितीचे काही लोक या तलावात मत्स्यपालन करायचे. पण त्यानंतर काही कारणास्तव मत्स्यशेती झाली नाही. त्यामुळं तलाव कचरामय झाला. संपूर्ण तलाव दलदल बनला. सुमारे 6 महिन्यांपूर्वी एका व्यक्तीनं या तलावातील अर्धा हेक्टर जमीन भरली.
चहापत्ती व्यावसायिकाचा तलावावर दावा : दोन वर्षांपूर्वी काम सुरू असतानाही या तलावावर एका चहापान व्यावसायिकानं दावा ठोकला होता. त्यावेळी विद्यापीठ पोलीसांनी त्याला कागदपत्रे मागितली होती. त्यानंतर त्या व्यक्तीनं कागदपत्रे सादर केली. पुढं हे प्रकरण न्यायालयात गेलं. मात्र समोरील पक्षकार न्यायालयात जमीन आपली असल्याचे सांगत आहे. आठ-नऊ दिवसांपूर्वी तलावात माती भरण्याचं काम झाल्याचं त्यांनी सांगितलं. प्रशासनाला सुगावाही लागला नाही.