हैदराबाद - महाराष्ट्रातून तेलंगाणा आणि आंध्र प्रदेशातील वीट भट्टीवर काम करण्यासाठी अनेक मजूर महाराष्ट्रातून स्थलांतरीत झाले आहेत. या मजुरांच्या सोबत वीटभट्टीवर त्यांचे चिमुकले मुलंही काम करत असल्याचं विदारक चित्र उघड झालं आहे. तेलंगाणात या चिमुकल्यांना मराठी शिक्षणाची कोणतीही व्यवस्था नसल्यानं वीटभट्टीवरील मजुरांच्या अनेक पिढ्या शिक्षणापासून वंचित राहत आहेत. ही बाब हेरुन पोलीस आयुक्त महेश भागवत यांनी पुढाकार घेत सामाजिक संस्थेच्या मदतीनं या चिमुकल्यांना मराठीतून शिक्षण देणारी वस्तीशाळा सुरू केली आहे. त्यामुळे या चिमुकल्यांच्या आयुष्यात आता उजेड पेरला जात आहे.
वीटभट्टीवरील मजुरांच्या मुलांच्या शिक्षणात अशी होती भाषीक अडचण -महाराष्ट्रालगतच्या प्रदेशातून अनेक मजूर तेलंगाणामधील वीटभट्टीवर काम करण्यासाठी स्थलांतरीत झालेले आहेत. यातील काही मजूर हे तिमायपल्ली येथील बशीर शेख यांच्या वीटभट्टीवर काम करतात. या मजुरांची 30 मुलं या मजुरांच्यासोबत राहत होती. मात्र मराठी भाषीक मुलांच्या शिक्षणाची व्यवस्था तेलंगाणात नाही. तेलंगाणातील सरकारी शाळेत तेलुगु भाषा शिकवली जाते. त्यामुळे मजुरांच्या मुलांना मराठी भाषेत शिकणं शक्य नव्हतं. त्यामुळे वीटभट्टीवरील अनेक पिढ्या शिक्षणापासून वंचित राहत आहेत.
पोलीस आयुक्त महेश भागवत यांच्या पुढाकारातून अशी सुरू झाली 'वस्तीशाळा' -तिमायपल्ली येथील वीटभट्टीवरील मजुराच्या मुलांना मराठी शाळा नसल्याची बाब रचकोंडाचे पोलीस आयुक्त महेश भागवत यांना समजली. त्यामुळे महेश भागवत यांनी अॅडे अॅक्ट या सामाजिक आणि शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या संघटनेच्या मदतीनं या वीटभट्टीवर वस्तीशाळा सुरू करण्याचा निर्धार केला. अॅडे अॅक्ट या संस्थेचे तेलंगाणा के सुरेश यांच्या मदतीनं ही वस्तीशाळा सुरू केली. या विटभट्टीच्या शेजारी असलेल्या सभागृहात ही वस्तीशाळा सुरू करण्यात आली. त्याचं उद्घाटन पोलीस आयुक्त महेश भागवत यांच्या हस्ते करुन या मुलांच्या शिक्षणाचा श्रीगणेशा करण्यात आला.