अयोध्या Ayodhya Ram Temple : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला २२ जानेवारीला राम मंदिराच्या उद्घाटनासाठी अयोध्येत न येण्याचं आवाहन केलं आहे. "भक्त म्हणून आम्हाला प्रभू रामचंद्रांना कोणत्याही अडचणीत टाकायला आवडणार नाही. तुम्ही २३ जानेवारीनंतर कधीही येऊ शकता. राम मंदिर आता कायमचंच तिथे आहे," असं मोदी म्हणाले.
२२ जानेवारीला घरात दिवा लावण्याचं आवाहन : नरेंद्र मोदी यांनी २२ जानेवारीला सर्वांना त्यांच्या घरात दिवा लावण्याचं आवाहन केलं आहे. "इतके वर्षे तंबूत घालवल्यानंतर अयोध्येत राम मंदिराच्या रूपानं राम लल्लाला कायमस्वरूपी घर मिळालं", असं पंतप्रधान म्हणाले. "राम लल्ला आणि देशातील चार कोटी गरीबांसाठी घरं बांधण्यात आली आहेत", असंही त्यांनी नमूद केलं. "सरकार देशातील अनेक ठिकाणांहून अयोध्येशी संपर्क सुधारण्यासाठी पावलं उचलत आहे", असं मोदींनी यावेळी सांगितलं.
३० डिसेंबर ऐतिहासिक तारीख :पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज (३० डिसेंबर) अयोध्या धाम रेल्वे स्थानक आणि महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन केलं. यासह मोदींनी आठ नवीन रेल्वे मार्गांना हिरवा झेंडा दाखवला. "देशाच्या इतिहासात ३० डिसेंबर ही अत्यंत ऐतिहासिक तारीख आहे. १९४३ मध्ये याच दिवशी नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी अंदमानमध्ये ध्वज फडकावला आणि भारताच्या स्वातंत्र्याची घोषणा केली होती," असं मोदी म्हणाले.
भारत जुन्या-नव्याचा मिलाफ : "कोणत्याही देशाला विकासाच्या नव्या उंचीवर पोहोचायचं असेल तर त्याचा वारसा जपला पाहिजे. आजचा भारत हा जुनं आणि नव्याचा मिलाफ आहे", असं त्यांनी सांगितलं. "आम्ही डिजिटल युगात पुढे जात आहोत आणि आमचा वारसाही जपत आहोत. वारसा जपून विकास व्हायला हवा आणि विकसित भारत पुढे नेला पाहिजे," असं मोदीनी शेवटी नमूद केलं.
हे वाचलंत का :
- अयोध्येत विकासपर्व! मथुराचे लोक कलाकार करणार पंतप्रधान नरेंद्र मोदींचं जोरदार स्वागत, हजारो कोटींच्या प्रकल्पांचं करणार लोकार्पण
- राममंदिर उद्घाटनासाठी 'रामायणा'त लक्ष्मणाची भूमिका साकारणाऱ्याचा मंदिर समितीला विसर