बिकानेर (राजस्थान) : राजस्थानमध्ये एका सभेला संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी काँग्रेस आणि राज्यातील गेहलोत सरकारवर जोरदार हल्ला चढवला. काँग्रेस म्हणजे लुटीचे दुकान आणि खोट्याचा बाजार आहे, असे पंतप्रधान म्हणाले. ते म्हणाले की, आज जी मोठमोठी आश्वासने दिली जात आहेत, त्यामागे लुटीचा हेतू आहे.
'शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे' : गेहलोत सरकारवर हल्लाबोल करताना ते म्हणाले की, खोट्या आश्वासनांचा सर्वात मोठा बळी राजस्थानमधील शेतकरी झाला आहे. काँग्रेसने 10 दिवसांत कर्जमाफी करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे. जिथे तुम्ही डबल इंजिनची सरकारे निवडून दिली आहेत, तिथे वेगाने विकास होत आहे, असे ते म्हणाले. राजस्थानमध्ये काँग्रेसचे सरकार आल्यापासून पक्ष आणि सरकार एकमेकांशी भांडत आहे. सगळे एकमेकांचे पाय ओढत आहेत, असेही ते म्हणाले.
'मुख्यमंत्र्यांना आपल्या मुलाची काळजी आहे' :मुख्यमंत्रीअशोक गेहलोत यांच्यावर हल्लाबोल करत पंतप्रधान म्हणाले की, राजस्थानचे मुख्यमंत्री आपल्या मुलाचे भविष्य वाचवण्यात व्यग्र आहेत. त्यांना राजस्थानच्या मुला-मुलींशी काहीही देणेघेणे नाही. असे लोक राजस्थानचे भले करू शकतात का?, असा सवाल त्यांनी केला. राजस्थानला स्थिर आणि डबल इंजिन सरकार हवे आहे. राजस्थानला विकासाची गरज आहे, परिवारवादाची नाही, असेही ते म्हणाले.