नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष मातामेला सिरिल रामाफोसा यांनी ब्रिक्स परिषदेचं निमंत्रण दिलं आहे. ब्रिक्स हा ब्राझिल, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका यांचा समावेश असलेला जागतिक अर्थव्यवस्थेचा समूह आहे. दक्षिण आफ्रिकेत 22 ते 24 ऑगस्टदरम्यान ब्रिक्स शिखर परिषद होणार आहे.
पंतप्रधान मोदींचा हा तिसरा दक्षिण आफ्रिका दौरा :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा तिसरा दक्षिण आफ्रिका दौरा आहे. विशेष म्हणजे दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्या राजनैतिक संबंधांच्या 30 व्या वर्धापन दिनानिमित्त हा दौरा होत आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याला विशेष महत्व प्राप्त झालं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष मातामेला सिरिल रामाफोसा यांच्यात द्विपक्षीय चर्चा होणार असल्याची शक्यता सूत्रांनी दिली आहे.
काय आहे ब्रिक्स शिखर परिषदेची थीम :यावर्षीची ब्रिक्स शिखर परिषद ही दक्षिण आफ्रिकेच्या अध्यक्षतेखाली होत आहे. 'ब्रिक्स आणि आफ्रिका परस्पर वेगवान वाढ; शाश्वत विकास आणि सर्वसमावेशक बहुपक्षीयतेसाठी भागीदारी' अशी यावर्षीची ब्रिक्स परिषदेची थीम आहे. त्यामुळे ब्रिक्स परिषदेत विविध विषयांवर चर्चा करण्यात येणार असल्याची माहिती परराष्ट्र सचिव विनय क्वात्रा यांनी दिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत जाणार व्यावसायिक शिष्टमंडळ :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत ब्रिक्स परिषदेत भारतातील व्यावसायिक शिष्टमंडळ जाणार असल्याची माहिती परराष्ट्र सचिव विनय क्वात्रा यांनी दिली. दक्षिण आफ्रिकेनं मोठ्या प्रमाणात इतर देशांना आमंत्रित केलं आहे. या शिखर परिषदेत व्यावसायिक बैठकाही आयोजित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे भारतातील व्यावसायिकांचं शिष्टमंडळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या दौऱ्यात सहभागी होणार असल्याची माहिती विनय क्वात्रा यांनी दिली आहे. कोरोनाच्या काळात तीन वर्षे ऑनलाईन बैठक घेतल्यानंतर पहिल्यांदाच ही ऑफलाईन बैठक होत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी घेणार द्विपक्षीय बैठका :पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दक्षिण आफ्रिकेत अनेक द्विपक्षीय बैठका घेणार आहेत. यात शिखर परिषदेनंतर आयोजित करण्यात आलेल्या 'ब्रिक्स आऊटरिच आणि ब्रिक्स प्लस डायलॉग' या विशेष कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सहभागी होणार आहेत. त्यासह परराष्ट्र मंत्रालयानं आमंत्रित केलेल्या इतर देशांच्या प्रतिनिधींसोबत पंतप्रधान द्विपक्षीय बैठका घेणार आहेत. याशिवाय जोहान्सबर्गमधील काही नेत्यांसोबत ते द्विपक्षीय बैठक घेणार असल्याची माहितीही परराष्ट्र सचिव विनय क्वात्रा यांनी दिली. ब्रिक्स शिखर परिषदेला रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन हे देखील हजेरी लावणार आहेत. शिखर परिषदेनंतर पंतप्रधान मोदी ग्रीसच्या पंतप्रधानांच्या निमंत्रणावरून 25 ऑगस्टला ग्रीसला जाणार असल्याची माहितीही यावेळी परराष्ट्र सचिव विनय क्वात्रा यांनी दिली आहे.