नवी दिल्ली : शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) च्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीन आणि पाकिस्तानवर अप्रत्यक्षपणे टीका केली. जागतिक शांततेसाठी दहशतवाद हा मोठा धोका असल्याचे सांगत मोदी म्हणाले की, काही देश दहशतवादाचा वापर सीमापार त्यांच्या धोरणांचे साधन म्हणून करतात. तसेच ते दहशतवाद्यांनाही आश्रय देतात. या बैठकीत चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन आदी सहभागी झाले होते.
'दहशतवाद जागतिक शांततेसाठी मोठा धोका' : मोदी म्हणाले की, 'दहशतवाद हा प्रादेशिक आणि जागतिक शांततेसाठी मोठा धोका आहे. हे आव्हान पेलण्यासाठी निर्णायक कृती आवश्यक आहे. दहशतवाद कोणत्याही स्वरूपाचा असो, त्याच्याविरुद्ध आपल्याला एकत्रितपणे लढायचे आहे. पाकिस्तानचा अप्रत्यक्ष संदर्भ देत ते म्हणाले की, काही देश सीमापार दहशतवादाचा वापर हत्यार म्हणून करतात. ते दहशतवाद्यांना आश्रय देतात. अशा देशांवर टीका करण्यास एससीओने अजिबात संकोच करू नये'.
'भारताचे अफगाणिस्तानच्या विकासात मोठे योगदान' : अफगाणिस्तानचा संदर्भ देत पंतप्रधान मोदी म्हणाले, 'अफगाणिस्तानबाबत भारताच्या चिंता आणि अपेक्षा बहुतेक SCO देशांसारख्याच आहेत. अफगाणिस्तानच्या लोकांच्या कल्याणासाठी आपल्याला एकत्रित प्रयत्न करावे लागतील'. ते म्हणाले की, 'भारत आणि अफगाणिस्तानमधील लोकांचे जुने मैत्रीपूर्ण संबंध आहेत. गेल्या दोन दशकांमध्ये भारताने अफगाणिस्तानच्या आर्थिक आणि सामाजिक विकासात मोठे योगदान दिले आहे'.