हैदराबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी 8 एप्रिल रोजी हैदराबादमध्ये येणार आहेत. त्यावेळी ते सिकंदराबाद ते तिरुपती दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनला हिरवा झेंडा दाखवतील. तसेच ते तेलंगणामध्ये सुमारे 11,355 कोटी रुपयांच्या विकासकामांची पायाभरणी करणार आहेत.
तिरुपतीचा प्रवास 3 तासांनी कमी होईल : केंद्रीय पर्यटन आणि सांस्कृतिक मंत्री जी किशन रेड्डी यांच्या कार्यालयातून रविवारी जारी करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सिकंदराबाद रेल्वे स्थानकावर पंतप्रधान तेलंगणातील सिकंदराबाद आणि शेजारच्या आंध्र प्रदेशातील तिरुपती दरम्यान रेल्वे सेवेला हिरवा झेंडा दाखवतील. देशात सुरू होणारी ही 13 वी वंदे भारत ट्रेन असेल. सिकंदराबाद आणि तिरुपती दरम्यानचा प्रवासाचा वेळ सध्याच्या 12 तासांवरून 8.5 तासांवर येण्याची अपेक्षा आहे, असे म्हटले आहे. तसेच तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या दोन तेलुगू भाषिक राज्यांदरम्यान धावणारी ही दुसरी वंदे भारत ट्रेन असेल. 15 जानेवारी रोजी मोदींनी सिकंदराबाद आणि आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम या दोन शहरादरम्यान वंदे भारत ट्रेनला डिजिटली हिरवा झेंडा दाखवला होता. दोन राज्यांना जोडणारी ही पहिली वंदे भारत एक्सप्रेस होती.