महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Mar 20, 2021, 1:41 PM IST

ETV Bharat / bharat

'खेळ संपला, आता फक्त विकास होणार'; दीदींच्या 'खेला होबे' घोषणेला मोदींचे प्रत्युत्तर

बंगालची सत्ता काबीज करण्यासाठी भाजपाने चांगलीच तयारी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज खरगपूरमध्ये प्रचारसभा घेतली. या सभेला हजारो नागरिक आले होते. यावेळी त्यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार टीका केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी

कोलकाता - विधानसभेच्या निवडणुका घोषित झाल्यापासून पश्चिम बंगालच्या राजकारणाकडे सर्वांचे लक्ष आहे. बंगालची सत्ता काबीज करण्यासाठी भाजपाने चांगलीच तयारी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज खरगपूरमध्ये प्रचारसभा घेतली. या सभेला हजारो नागरिक आले होते. यावेळी त्यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार टीका केली. मोदींनी बंगाली भाषेतून भाषणाला सुरवात केली. ममता दीदींच्या 'खेला होबे' (खेळ सुरु) या घोषणेलाही मोदींनी या प्रचारसभेत उत्तर दिले.

पंतप्रधान मोदींच्या भाषणातील प्रमुख मुद्दे -

यावेळी भाजपला पाच वर्षाची संधी द्या. गेल्य 70 वर्षांत राज्याचे जे नुकसान केले आहे. ते भरून काढू. भारतीय जनता पार्टी खर्‍या अर्थाने बंगालचा पक्ष आहे. आम्ही बंगालला विकासाच्या नवीन उंचीवर नेऊ इच्छितो.

मला अभिमान आहे भाजपात दिलीप घोष यांच्यासारखे अध्यक्ष आहेत. त्याच्यावर बरेच हल्ले झाले, त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला गेला. परंतु त्यांनी बंगालच्या उज्ज्वल भविष्यासाठी काम केले. आज संपूर्ण बंगालमध्ये नवीन ऊर्जा भरली जात आहे. बंगालने काँग्रेसचे कारनामे पाहिले आहेत, डाव्यांच्या वेंधळ्या सत्तेचा अनुभव घेतला आहे. तसेच टीएमसीने तुमची स्वप्ने चिरडून टाकताना तुम्ही पाहिलयं. आता भाजपाला संधी द्या.

पश्चिम बंगालमध्ये केंद्राच्यो योजना दीदींनी लागू करू दिल्या नाहीत. तुम्ही दीदींवर विश्वास ठेवला, पण दीदींने तुमचा विश्वासघात केला. दीदींनी तुम्हाला गेल्या 10 वर्षात लुटले, भ्रष्टाचार केला.

ममता बॅनर्जी यांच्या 'खेला होबे' घोषणेला मोदींनी 'विकास होबो' ही घोषणा करत प्रत्युत्तर दिले. आता बंगालमध्ये खेळ संपेल आणि विकासाला सुरवात होईल. ममता बॅनर्जी यांनी बंगालच्या तरुणांची दहा वर्षे खराब केली. राज्यातील शिक्षणाची काय परिस्थिती आहे, हे खरगपूरच्या लोकांना चांगलेच ठाऊक आहे. शिक्षक भरतीच्या नावाखाली येथील युवकांना न्यायालयात हेलपाटे मारावे लागत आहेत.

मी बंगालच्या लोकांना आश्वासन देतो, की दीदींना लोकशाही चिरडण्याची परवानगी दिली जाणार नाही. घटना आणि लोकशाहीच्या मर्यादेपेक्षा काहीही मोठे नाही. बंगालच्या उन्नतीसाठी काम करू. राज्यात दीदींनी फक्त माफिया उद्योग चालवण्यास परवानगी दिली आहे.

पश्चिम बंगालची राजकीय स्थिती काय?

पश्चिम बंगालमध्ये एकूण आठ टप्प्यात मतदान होणार असून 2 मे रोजी विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होणार आहेत. पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या एकूण 294 जागा आहेत. याठिकाणी बहुमतासाठी 148 आमदारांच्या संख्याबळाची गरज आहे. गेल्या निवडणुकीत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने 211 जागांवर विजय मिळवत एकहाती सत्ता स्थापन केली होती. तर काँग्रेसला 44, डाव्या पक्षांना 26 आणि भाजपला अवघ्या तीन जागांवर विजय मिळाला होता.

हेही वाचा -संसदेत महाराष्ट्र : जाणून घ्या राज्यातील खासदार संसदेत काय बोलले?

ABOUT THE AUTHOR

...view details