गोरखपूर (उत्तरप्रदेश): मुंबईहून गोरखपूरला येणाऱ्या इंडिगो विमानाच्या टॉयलेटमध्ये एका प्रवाशाने गुपचूप सिगारेट ओढायला सुरुवात केली. त्यामुळे विमानाचा फायर अलार्म वाजला. यावर क्रू मेंबर्स धावले. त्यांनी प्रवाशाला ताबडतोब सिगारेट विझवण्यास सांगितले. फायर अलार्म वाजल्याने प्रवासी काही काळ घाबरले होते. विमान गोरखपूर विमानतळावर उतरल्यानंतर प्रवाशाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली. यापूर्वीही अनेकदा इंडिगोच्या विमानामध्ये प्रवाशांकडून अशाप्रकारे वेगवेगळे कृत्य घडलेले आहेत. मात्र चक्क विमानातच प्रवाशाने सिगारेट ओढल्याने विमान प्रवासाच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
एसपी सिटी कृष्ण कुमार विश्नोई यांनी सांगितले की, गुरुवारी इंडिगोचे विमान मुंबईहून प्रवाशांना घेऊन गोरखपूरला येत होते. ही फ्लाइट 6E- 544 मुंबईहून दररोज उड्डाण करते. ते रोज संध्याकाळी ६ वाजता गोरखपूरला उतरते. बिहारमधील गोपालगंज जिल्ह्यातील पुरैना महेशपूर येथील रहिवासी कृष्ण कुमार मिश्रा हे देखील गुरुवारी या विमानातून प्रवास करत होते. यादरम्यान ते फ्लाइटच्या टॉयलेटमध्ये गेले. तिथे गुपचूप सिगारेट ओढू लागले. धुरामुळे फ्लाइटचा फायर अलार्म वाजला. त्यामुळे क्रू मेंबर्ससह प्रवासीही घाबरले. क्रू मेंबरने कृष्ण कुमारला पकडून सिगारेट विझवली.