नवी दिल्ली : विमानातील प्रवाशांकडून असभ्य वर्तनाच्या घटना सातत्याने समोर येत असून, अशा घटना वाढतच चालल्या आहेत. ताजे प्रकरण इंडिगो विमानाशी संबंधित आहे, जे दिल्लीहून बेंगळुरूला उड्डाण करत होते. या विमानातील ४० वर्षीय प्रवाशाने नशेत विमानाच्या आपत्कालीन दरवाजाचा फ्लॅप उघडण्याचा प्रयत्न केला. शुक्रवारी सकाळी ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे.
क्रूने प्रवाशाला इशारा दिला होता: इंडिगो एअरलाइन्सच्या म्हणण्यानुसार, दिल्ली-बंगलोर फ्लाइटमध्ये प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाने मद्यधुंद अवस्थेत आपत्कालीन दरवाजाचा फ्लॅप उघडण्याचा प्रयत्न केला. असे केल्यावर क्रूने प्रवाशाला तसे न करण्याचा इशारा दिला. यानंतर विमान सुरक्षितपणे उतरवण्यात आले. तसेच, बेंगळुरूला पोहोचल्यावर आरोपीला सीआयएसएफच्या ताब्यात देण्यात आले.
कारवाईनंतरही घटना थांबल्या नाहीत : विमान प्रवासादरम्यान प्रवाशांकडून असभ्य वर्तनाची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. हवाई वाहतूक नियामक महासंचालनालयानेही या प्रकरणांमध्ये कारवाई केली आहे, मात्र तरीही या घटना थांबत नाहीत. मोठी बाब म्हणजे यामध्ये इतर प्रवाशांचा जीवही धोक्यात आला आहे.
आसामहून बेंगळुरूला येणाऱ्या इंडिगोच्या फ्लाइटमध्ये प्रवाशाने पेटवली सिगारेट : यापूर्वी दुबईहून मुंबईला येणाऱ्या फ्लाइटमधील दोन प्रवाशांनी मद्यधुंद अवस्थेत गोंधळ घातला होता. त्यांच्या तक्रारीवरून मुंबई पोलिसांनी दोन्ही प्रवाशांविरुद्ध एफआयआर नोंदवून त्यांना अटक केली. याशिवाय आसामहून बेंगळुरूला येणा-या इंडिगो फ्लाइटमध्ये एका प्रवाशाने सिगारेट पेटवली होती.
जानेवारीतही झाला होता प्रयत्न:नागपूरहून मुंबईला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानाचा आपत्कालीन दरवाजा उघडण्याचा प्रयत्न जानेवारी महिन्यात एका प्रवाशाने केला होता. विमानाचा आपत्कालीन दरवाजा उघडल्यास विमानाचा अपघात झाला असता. त्यामुळे या प्रवाशावर इतरांचा जीव धोक्यात घालण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. इमर्जन्सी गेट उघडण्याचा प्रयत्न : इंडिगो कंपनीचे विमान 24 जानेवारीला सकाळी 11 च्या सुमारास बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन मुंबईकडे निघाले होते. दुपारी 12: 30 च्या सुमारास विमान मुंबई विमानतळावर उतरत असतानाच एका प्रवाशाने अचानकपणे आपत्कालीन दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केल्याचे वैमानिकाला लक्षात आले.
हेही वाचा: पीएम मोदींकडून आज हजारो कोटींच्या कामांची पायाभरणी